गेल्या काही दिवसांपासून साउथच्या हिंदीत डब झालेल्या चित्रपटांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा काही महिन्यांपूर्वी 'पुष्पा' (Pushpa Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी खूप चर्चेत आली होती. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade)ने आवाज दिला होता. त्याच्या आवाजाची सर्वत्र खूप चर्चा झाली होती. त्यानंतर आरआरआर रिलीज झाला आणि काही दिवसांपूर्वी 'केजीएफ २' (KGF 2) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला रिलीज होऊन बरेच दिवस उलटले असतानाही अद्याप या चित्रपटाची चाहत्यांमधील क्रेझ कमी झालेली नाही. नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदेनेकेजीएफ २ च्या हिंदी डबिंगवर एक वक्तव्य केले आहे.
नुकतेच एका मुलाखतीत श्रेयस तळपदेला केजीएफ २च्या हिंदी व्हर्जनला आवाज का दिला नाहीस, असे विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, ज्याने या चित्रपटासाठी डबिंग केले असेल ते नक्कीच अप्रतिम असेल. पुढे तो म्हणाला की, मी अजून केजीएफ २ पाहिलेला नाही. पण मला खात्री आहे की ज्या कलाकाराने या चित्रपटाचे डबिंग केले असेल त्यांनी नक्कीच जबरदस्त काम केले असेल. श्रेयसचे हे उत्तर ऐकल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.