Join us

Jhund : ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? वाचा, नागराज मंजुळे यांचं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 6:00 PM

Jhund :‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच एक तक्रारही कानी येतेय...

‘सैराट’ सिनेमा आठवला की पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या अन् नागराज मंजुळे. होय, हिंदीच्या तोडीस तोड 100 कोटींची कमाई करणारा मराठी सिनेमा बनवून नागराज यांनी इतिहास रचला. या सिनेमानं प्रेक्षकांवर नुसती जादू केली. इतकी की, चक्क बॉलिवूडला ‘सैराट’चा रिमेक बनवण्याचा मोह आवरता आला नाही. 

 ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे (Nagraj Popatrao Manjule) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ (Jhund ) नावाचा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. मराठीनंतर थेट हिंदी सिनेमा आणि  या सिनेमात आहे कोण तर बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, त्यामुळेच सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. अर्थात या चर्चेसोबतच नागराज यांच्याबद्दलची एक गोड तक्रारही कानी येतेय. नागराज यांनी ‘झुंड’ मराठीत का बनवला नाही? असा प्रश्न सोशल मीडियावर त्यांना विचारला जातोय.

आता खुद्द नागराज यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात नागराज यांना नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘पुष्पा हिंदीत कुणी का बनवला नाही?’असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. 

ते म्हणाले, ‘पुष्पा मराठीत का केला नाही किंवा मग तो तेलगूत का पाहिलात, हिंदीत का पाहिलात? फेसबुकवर मी पाहतोय. पण तिथे काही सेन्सिबल गोष्टींवर चर्चा होत नाही. मराठीत चित्रपट केला पाहिजे, मग बच्चन साहेबांनी पण मराठीत केला पाहिजे ना. बच्चन साहेबांनी मराठी शिकून मराठी भाषेत चित्रपट करता येईल, इतका रूबाब मराठी भाषेचा आणि दिग्दर्शकाचा म्हणजे माझा झाला पाहिजे. त्यासाठी तेवढा वेळ पाहिजे. बच्चन साहेब मराठीत सिनेमा करतील, तेवढे पैसे निर्मात्यांनी  दिले पाहिजे. हे काही सोप नाही. आज मी हिंदी चित्रपट केला. उद्या असं होईलही की बच्चन साहेब मराठी चित्रपट करतील. उगीच फेसबुकवर लोळल्या लोळल्या काही तरी बोलायचं. या सगळ्या गोष्टी लगेच होत नाहीत. हळूहळू होतील.’

येत्या ४ मार्चला झुंड प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन एका फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. 

टॅग्स :नागराज मंजुळेअमिताभ बच्चनसिनेमा