Karishma Kapoor-Govinda: कुली नंबर १ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हिरो नंबर १ हा सिनेमाही तुमच्या आठवणीत असेल. या सिनेमातील ऑनस्क्रीन हिट जोडीही तुम्ही नक्कीच विसरले नसाल. या जोडीला बॉलिवूड प्रेमींनी चांगलंच डाेक्यावर घेतलं होतं. आम्ही बोलतोय ते गोविंदा व करिश्मा कपूर या जोडीबद्दल. गोविंदा व करिश्मा ही ९० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय जोडी. या जोडीनं एक दोन नाही तर तब्बल ११ सिनेमांत एकत्र काम केलं. राजा बाबू, हिरो नंबर १, कुली नंबर १, साजन चले ससुराल, हसीना मान जाएगी अशा अनेक चित्रपटात करिश्मा व गोविंदाची जाेडी एकत्र दिसली. या जोडीचे अनेक सिनेमे हिट झालेत. यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री लोकांना भावली. साहजिकच प्रत्येक निर्माता या जोडीला आपल्या सिनेमात घेण्यास उत्सुक होता. पण अचानक असं काही झालं की, ही जोडी दुभंगली.
एकापाठोपाठ एक गोविंदासोबत सिनेमे साईन करणाऱ्या करिश्माने अचानक त्याच्यासोबत काम करण्यास नकार द्यायला सुरूवात केली. असं का, असा प्रश्न आजही अनेक चाहत्यांना पडतो. आता कदाचित यामागचं खरं कारण समोर आलं आहे.
म्हणून तुटली करिश्मा व गोविंदाची जोडी?एका मुलाखतीत करिश्मा गोविंदासोबतच्या चित्रपटांवर बोलली. गोविंदासोबत काम करताना मजा यायची. त्याच्यासोबत काम करताना खूप कम्फर्टेबल वाटायचं. गोविंदासोबत मी अनेक हिट सिनेमे दिलेत. पण बॅक टू बॅक हिट सिनेमे दिल्यानंतरही मला माझ्या अन्य समकालीन अभिनेत्रींसारखी लोकप्रियता मिळू शकली नाही, असं ती म्हणाली. कदाचित यामुळेच करिश्माने गोविंदा सोडून बॉलिवूडच्या तिन्ही खानांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. अर्थात या निर्णयाचाही पुढच्या करिअरमध्ये करिश्माला फारसा फायदा झाला नाही, हा भाग अलहिदा.