का थांबलेयं, ‘बाहुबली2’च्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 3:17 PM
‘बाहुबली: दी कन्क्लुजन’चा क्लायमॅक्स सीन लीक झाल्याच्या बातम्या आल्या आणि बी-टाऊनमध्ये खळबळ माजली होती. याप्रकरणी एका ग्राफिक्स डिझाईनरलाही अटक ...
‘बाहुबली: दी कन्क्लुजन’चा क्लायमॅक्स सीन लीक झाल्याच्या बातम्या आल्या आणि बी-टाऊनमध्ये खळबळ माजली होती. याप्रकरणी एका ग्राफिक्स डिझाईनरलाही अटक करण्यात आली होती. पण या लीक प्रकरणानंतर ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आणि निर्मात्यांनी ताक सुद्धा फुंकून प्यायचा निर्णय घेतला आहे. होय, या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोठी पाऊले उचलण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘बाहुबली2’च्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम रोखण्यात आले आहे. चित्रपटाशी संबंधित कुठलीही गोष्ट सेटबाहेर जाणार नाही, यासाठी कडक उपाययोजना होईपर्यंत पोस्ट-प्रॉडक्शनचे काम थांबवण्यात आले आहे.प्रभास स्टारर या चित्रपटाचे शूटींग अलीकडेच पूर्ण झाले. सध्या चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्स आणि प्रॉडक्शनचे काम बाकी आहे. हे काम सुरु असलेल्या ठिकाणी कडक पहारा ठेवण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकार आणि टीमला मीडियाशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे.‘बाहुबली२’चा क्लायमॅक्स सीन लीक होणे, सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. हा लीक झालेला क्लायमॅक्स सीन लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नऊ मिनिटांच्या या फुटेजमध्ये प्रभास आणि अनुष्का शेट्टी दिसत होते. एडिट मशीनमधून हा सीन चोरण्यात आला होता. आंध्र पोलिसांनी या प्रकरणी विजयवाड्यातून एका ग्राफिक्स डिझाईनरला अटक केली होती. चित्रपटाचे लेखक आणि राजमौली यांचे वडील के. व्ही विजयेन्द्र प्रसाद यांनी या लीक प्रकरणाची तीव्र शब्दांत निंदा केली होती. हे कृत्य अतिशय घाणेरडे आहे. मात्र आता अशा घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान शेकडो लोक काम करत असतात. अशावेळी एखाद्याने केवळ आपल्या मित्रांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्या मोबाईलने सेटवरचा एखादा सीन शूट केला तर नाईलाज आहे.