70 आणि 80 च्या दशकात चितचोर व गोपालकृष्ण या सारख्या सिनेमात काम करणारी अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) हिचा आज वाढदिवस. 17 जुलै 1959 रोजी आंध्रच्या विशाखापट्टनममध्ये जन्मलेल्या जरीनाची चित्रपटातील पर्दापणाची कथा चांगलीच इंटरेस्टिंग आहे.जरीनाने पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची जाहिरात बघितली आणि लगेच अॅडमिशनसाठी अर्ज केला. जरीनाचे अॅडमिशनही झाले. यामुळे बॉलिवूडमध्ये येण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला. पण एक अडचण होतीच. त्याकाळी हिरोईन गोरी असणे म्हणजे जणू एक अनिवार्य अट होती. पण जरीना वर्णाने सावळी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी तिला नकार पचवावे लागलेत. तिला मिळालेल्या नकाराचा एक किस्सा शोमॅन राज कपूर (Raj Kapoor) यांच्याशी संबंधित आहे.
होय, एकदा एका चित्रपटाच्या रोलसाठी जरीना राज कपूर यांना भेटायला गेली. राज कपूर यांनी जरीनाला पाहिले आणि तू कधीच हिरोईन बनू शकणार नाहीत, असे तिला म्हणाले. राज कपूर यांचे हे शब्द ऐकून जरीनाला प्रचंड मोठा धक्का बसला होता. पण तिने कसेबसे स्वत:ला सावरले आणि संघर्ष सुरु ठेवला.यानंतर ऋषीकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’साठी जरीनाची निवड केली. पण ऐनवेळी जरीनाची हकालपट्टी झाली आणि हा रोल जया बच्चनला दिला गेला. मग मात्र जरीनाचा धीर सुटला. प्रतिभा असूनही सतत मिळणा-या नकारामुळे ती खचली. पण म्हणून तिने प्रयत्न सोडले नाहीत.
देव आनंद आपल्या ‘इश्क इश्क इश्क’ या सिनेमासाठी एका नव्या चेह-याच्या शोधात असल्याचे तिला कळले आणि ती थेट मेहबूब स्टुडिओत पोहोचली. या सिनेमात जरीनाला झीनत अमानच्या बहीणीची भूमिका मिळाली. अर्थात हा सिनेमा दणकून आपटला. मात्र जरीनने तरीही हिंमत सोडली नाही. पुढे अनेक संघषार्नंतर तिला राजश्री प्रॉडक्शनचा चितचोर हा सिनेमा मिळाला. याच सिनेमाने तिला खरी ओळख दिली. यापश्चात घरौंदा, अनपढ, सावन आने दो, नैया, सितारा, तडप अशा अनेक सिनेमात तिने काम केले.
1986 मध्ये कलंक का टीका या सिनेमाच्या सेटवर जरीनाची ओळख आदित्य पांचोलीशी झाली. पहिल्याच नजरेत दोघे प्रेमात पडले आणि 20 दिवसानंतर दोघांनी लग्नही केले. हे लग्न फार काळ टिकणार नाही, असे तेव्हा अनेकजण म्हणाले होते. पण जरीनाने आपला संसार टिकवून ठेवला. सना व सूरज अशी दोन मुले तिला झाली. आजही ती सिनेइंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे.