रामचरण अख्खी मुंबई अनवाणी पायानं फिरला.., समोर आलं त्यामागील खास कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:13 PM2022-04-04T13:13:36+5:302022-04-04T13:42:57+5:30
Ram Charan : काल रविवारी अभिनेता रामचरण मुंबईत होता. प्रायव्हेट एअरपोर्टवर तो दिसला आणि त्याला पाहून सगळेच हैराण झालेत. कारण काय तर रामचरण अनवाणी पायानं होता.
‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरही याच चित्रपटाची हवा आहे. रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोन सुपरस्टार्सनी या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचंही प्रचंड कौतुक होतंय. या दोघांचा अभिनय चाहत्यांना भावतोच, पण त्यापेक्षा भावतो तो त्यांचा साधेपणा. काल रविवारी अभिनेता रामचरण (Ram Charan ) मुंबईत होता. प्रायव्हेट एअरपोर्टवर तो दिसला आणि त्याला पाहून सगळेच हैराण झालेत. कारण काय तर रामचरण अनवाणी पायानं होता.
सर्वप्रथम रामचरण मुंबईच्या प्रायव्हेट एअरपोर्टवर स्पॉट झाला. यानंतर वांद्र्यातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसला. शिवाय गेटी गॅलेक्सी थिएटरमध्येही तो पोहोचला. यावेळी त्याच्या पायात चप्पल नव्हती. सर्वठिकाणी तो अनवाणी पायानं फिरला. काळ्या कपड्यांमधील अनवाणी पायानं फिरतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झालेत. मग काय सोशल मीडियावर वेगळ्याच प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड कलाकारांनी साऊथच्या या अॅक्टर्सकडून काही शिकावं, असे सल्ले नेटकरी देताना दिसले. अर्थात रामचरणच्या असं रामचरण अनवाणी पायानं येण्यामागं एक खास कारण आहे.
कारण काय तर रामचरणनं 41 दिवसांची भगवान अयप्पांची दीक्षा घेतली आहे. या 41 दिवसांत दीक्षा घेणाºया भाविक आपलं सगळं काही भगवान अयप्पांना समर्पित करतो. सबरीमाला येथील भगवान अयप्पांचे दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या भाविकाला त्याआधी 41 दिवसांचं व्रत पूर्ण करावं लागतं. याला मंडलम म्हणतात. या काळात अनेक गोष्टी वर्ज्य असतात. 41 दिवस काळी वस्त्र परिधान करणं, चटईवर झोपणं, अनवाणी फिरणं, ब्रह्मचर्य पाळणं, मासांहार-मद्यपानाचा त्याग, दिवसातून एकवेळ सात्विक भोजन, रोज संध्याकाळी पूजा अर्चा अशा कडक नियमांचं पालन करावं लागतं. रामचरणनं सध्या भगवान अयप्पांचं हे व्रत करतोय. दरवर्षी तो हे व्रत करतो.
तुम्हाला आठवत असेलच तीन महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यानेही हे व्रत पूर्ण करत, भगवान अयप्पांचं दर्शन घेतलं होतं.