सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे काहीही महत्त्वाचे कारण असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावे असे सगळ्यांना सरकारने सांगितले आहे.
अनेकांना मॉर्निंग वॉकला जाण्याची दररोजची सवय असते. पण या काळात लोकांनी मॉर्निंग वॉकला देखील जाऊ नये असे लोकांना बजावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मॉर्निंग वॉकला जात असलेल्या लोकांवर पोलिस कारवाई करत आहेत. पण या सगळ्यात सलमान खानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान लॉकडाऊनचा नियम मोडत असल्याचा आरोप वांद्रेतील स्थानिक लोकांनी केला आहे. एनडिटिव्हीने दिलेल्या वृ्तानुसार, सध्या भारतात लॉकडाऊन असला तरी सलीम खान त्यांच्या मित्रांसोबत दररोज मॉर्निंग वॉकला जात आहेत. ते केवळ सेलिब्रेटी असल्याने त्यांना लॉकडाऊनचा नियम लागू होत नाही का असा सवाल देखील तेथील लोकांनी केला आहे. वांद्रे येथील स्थानिकांनी सरकारला प्रश्न विचारला आहे की, सलीम खान दररोज मॉर्निंग वॉक करत असून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये.
या प्रकरणावर सलीम खान यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मला पाठदुखीचा प्रचंड त्रास आहे आणि त्याचमुळे डॉक्टरांनी मला दररोज चालण्याचा सल्ला दिला आहे. त्याचमुळे मी न चुकता दररोज मॉर्निंग वॉकला जातो. मला ही सवय गेल्या ४० वर्षांपासून आहे. पण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मी माझे चालणे अचानक बंद केले तर माझा पाठदुखीचा त्रास वाढू शकतो आणि त्याचमुळे योग्य ती खबरदारी घेऊनच मी मॉर्निंग वॉकला जातो आणि ते ही मी केवळ अर्धा तास मॉर्निंग वॉक करतो.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान ४० वर्षांपासून कबूतरांना नियमित दाणे टाकायला तिथे जातात.