बॉलिवूडच्या मोस्ट हॅण्डसम हिरोंमध्ये विनोद खन्ना यांची गणना केली जात असे. 27 एप्रिल 2017 ला कर्करोगाने त्यांचे निधन झाले. कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजाराशी ते अनेक दिवसांपासून झुंज देत होते. या आजारपणामुळे त्यांचे वजन कमी झाल्याने त्यांना ओळखणेदेखील कठीण झाले होते. त्यांचा रुग्णालयात असतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि हा फोटो पाहून त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनोद खन्ना यांना कर्करोग असल्याचे त्यांना त्यांच्या निधनाच्या सहा वर्षं आधीच कळले होते. पण ते या आजारावर मात करतील याची त्यांना खात्री होती. त्यांचा आजार 80 टक्के बरा झाला असे डॉक्टरांचे देखील म्हणणे होते. ते अनेकवेळा उपाचारासाठी जर्मनीला देखील जाऊन आले होते. तिथे त्यांच्यावर सर्जरी देखील झाली होती. पण अखेरीस या आजारावर त्यांना मात करता आली नाही. त्यांना कॅन्सर झाला हे ज्यावेळी त्यांना कळले, त्यावेळी त्यांच्या मुलीची महत्त्वाची परीक्षा सुरू होती आणि त्यांच्या मुलीला पालकांची नितांत गरज होती. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. त्यांनी काही काळानंतर या गोष्टीबद्दल त्यांच्या बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील जवळच्या व्यक्तींना सांगितले होते.
1968 ते 2013 या 45 वर्षांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीत विनोद खन्ना यांनी एकूण 141 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पदार्पण करताना त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला साहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली.
पण पुन्हा पाच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करून अनेक हिट चित्रपट दिले. शाहरूख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या दिलवाले या चित्रपटात ते शेवटचे झळकले होते.