'टॉयलेट : एक प्रेमकथा' आणि 'परी' या चित्रपटांच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी मोदींवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली. भारतातील सगळ्यात हँडसम आणि योग्य व्यक्ती असल्यामुळे मोदींवर बायोपिक काढण्याचा विचार करत असल्याचं प्रेरणा यांनी सांगितलं.
झूमने दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा अरोरा यांच्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका बिग बींनी साकारावी, अशी इच्छा प्रेरणा यांची इच्छा आहे. बिग बी मोदींची भूमिका उत्तमरित्या साकारू शकतात. मोदींच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन परफेक्ट असल्याचंही प्रेरणा यांनी सांगितलं. नरेंद्र मोदींवरील बायोपिकमध्ये त्यांच्या जीवनातील अनेक टप्प्यांवर भाष्य करण्यात येणार आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे.
२०१९ साली 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' हा नरेंद्र मोदींवरील चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाबद्दल विचारलं असता "मी हा चित्रपट पाहिलेला नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या चित्रपटाला पूर्ण न्याय देईन," असं प्रेरणा यांनी सांगितलं.