Join us

घटस्फोटानंतर ईशा देओलची राजकारणात एन्ट्री? हेमा मालिनींनी दिले संकेत, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:55 IST

अभिनयानंतर आता ईशा देओल राजकारणात तिचं नशीब आजमवणार आहे. आईचा आदर्श ठेवत ईशा राजकीय कारकीर्दीला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओलने भरत तख्तानीपासून घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं सांगितलं. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ईशाने कलाविश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. पण, तिला बॉलिवूडमध्ये हवं तितकं यश मिळालं नाही. आता घटस्फोटानंतर ईशाच्या राजकारणातील एन्ट्रीबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. ईशा राजकारणात एन्ट्री घेणार असल्याचे संकेत खुद्द हेमा मालिनींनी दिले आहेत.

अभिनयानंतर आता ईशा देओल राजकारणात तिचं नशीब आजमवणार आहे. आईचा आदर्श ठेवत ईशा राजकीय कारकीर्दीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. खुद्द हेमा मालिनी यांनीच याबाबत भाष्य केलं आहे. हेमा मालिनी या लोकसभेत मथुराचं प्रतिनिधित्व करत आहेत. राजकारणातील करियरसाठी धर्मेंद्र यांनी त्यांना खूप मदत केल्याचं हेमा मालिनींनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्या म्हणाल्या, "माझं कुटुंब नेहमी माझ्यासोबत होतं. त्यांच्यामुळेच मी हे करू शकले. मी जे काही करत आहे त्यामुळे धर्मेंद्र खूश आहेत. तेदेखील कधी कधी माझ्यासोबत मथुराला येतात." 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा आणि अहाना या दोन मुली आहेत. लेकींच्या राजकारणात येण्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. "त्यांना यायचं असेल तर या येऊ शकतात. पण, ईशाचा राजकारणाकडे कल आहे. तिला याची आवड आहे. पुढच्या काही वर्षात तिची इच्छा असेल तर ती नक्कीच राजकारणात उतरेल," असं हेमा मालिनी म्हणाल्या. 

दरम्यान, ईशा देओल पतीपासून वेगळं झाल्यानंतर चर्चेत आली आहे. ईशाने व्यावसायिक भरत तख्तानीशी २०१२मध्ये विवाह करत संसार थाटला होता. पण, लग्नाच्या १२ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राध्या आणि मिराया या दोन मुली आहेत. 

टॅग्स :इशा देओलधमेंद्रहेमा मालिनी