मागील वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडच्या काही सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली होती. त्या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत होता. हा व्हिडीओ बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या हाउस पार्टीचा होता. जिथे बॉलिवूडमधील बरेच कलाकार दिसत होते. करण जोहरच्या या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या व्हिडीओची तपासणी करण्यात आली होती, मात्र त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने यावर कोणतेही स्टेटमेंट दिले नव्हते. करण जोहरने त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र त्याला एनसीबीकडून क्लीन चिट देखील मिळालेली नाही. दरम्यान, आता असे समजते आहे की करण जोहरच्या २०१९च्या पार्टीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आला आहे.
दैनिक भास्करच्या रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाचा तपास एनसीबीने बंद केलेला नाही. इतकेच नाही तर एनसीबीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून ६ महिन्यांचा अधिक वेळ मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी या व्हिडीओची चौकशी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती, जी त्यांना मिळाली आहे. आता यानंतर अनेक बॉलिवूडचे कलाकार समीर वानखेडे यांच्या निशाण्यावर येणार आहेत.