१९९८ मध्ये काळवीट शिकारीनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. सलमानला अनेकदा धमकी देण्यात आली. त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यानंतर आता अभिनेत्याचे जवळचे मित्र आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बिश्नोई गँगने या हत्येची सोशल मीडिया पोस्टद्वारे जबाबदारी घेतली आहे. तसेच या पोस्टमध्ये सलमानचा उल्लेख करण्यात आला आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार का? असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. याचीच सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीने इंडिया टुडेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान लॉरेन्स बिश्नोई गँगची माफी मागणार का?, सतत होणारे हल्ले टाळण्यासाठी कोणते पर्याय आहेत किंवा काय सॉल्यूशनवर सलमान विचार करत आहे? याबाबत माहिती दिली आहे.
इंडिया टुडेला या व्यक्तीने सांगितलं की, जर सलमानने माफी मागितली तर याचा अर्थ तो या प्रकरणात अडकला आहे. त्याने जे केले नाही त्याबद्दल तो माफी मागणार नाही. इतकी वर्षे त्याने हे केले नाही, आता तो तसं करण्याची शक्यता फारच कमी आहे. सलमानचे मित्र आणि कुटुंबीयांना त्याच्या तब्येतीची खूप काळजी आहे. त्यांच्यासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे.
सलमान प्रत्येक वेळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातो किंवा शूटिंगसाठी बाहेर जातो तेव्हा कुटुंबीयांना जास्त काळजी वाटत असते. मात्र या प्रकरणात घरातील सर्व मंडळी त्याच्यासोबत आहेत आणि त्याने घेतलेल्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करतात. सलमानने माफी मागितली नाही तर त्याच्याकडे पर्याय काय? याबाबत देखील सांगितलं आहे.
सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. तसेच पोलीस यंत्रणा देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सलमान त्याने दिलेल्या कमिटमेंट्सपासून मागे हटणार नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुढे जाईल. त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे तो आपलं काम करणं कमी करणार नाही. त्यामुळे तो नियोजित वेळेनुसार आपलं काम करेल असं देखील सलमानच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे.