कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. मोठ मोठ्या चित्रपटाचे शूटींग रखडले आहे. नव्या चित्रपटांचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे कधी उघडतील आणि उघडलीच तर प्रेक्षकांना चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळेल, याबद्दल अख्खे बॉलिवूड साशंक आहे. अशात काही मोठे सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सलमान खानचा आगामी सिनेमा ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सुद्धा ओटीटीवर रिलीज होणार अशी चर्चा आहे. इतकेच नाही तर या डिलसाठी ‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’च्या मेकर्सनी 250 कोटींची मागणी केल्याची चर्चा आहे. पण आता ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
होय, सलमानचा भाऊ सोहेल खान याने याबद्दल खुलासा केला आहे. ‘राधे हा सलमानचा सिनेमा केवळ चित्रपटगृहांत रिलीज होईल. ओटीटी रिलीजबद्दलच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. 2020 च्या शेवटी किंवा 2021 च्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होईल,’ असे ट्विट सोहेल खानने अधिकृतपणे केले आहे.
सलमानच्या या सिनेमाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. मात्र सिनेमाचे शूटींग सुरू असतानाच कोरोनाने भारतात शिरकाव केला आणि पाठोपाठ लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे चित्रपटाचे शूटींग रोखण्यात आले. अद्याप चित्रपटाच्या काही गाण्यांचे आणि काही सीक्वेंन्सचे बाकी आहे.
‘राधे- योर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा सिनेमा प्रभुदेवा दिग्दर्शित करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.