Gadar 2, President of India: गदर-2 रुपेरी पडद्यावर बक्कळ कमाई करत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गदर-2 या चित्रपटाने या भारतभरात २०० कोटींच्या गल्ला जमवला आहे आणि अजूनही यशस्वी घोडदौड सुरू आहे. या सगळ्या दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी या चित्रपटाचे व्हीआयपी स्क्रीनिंग केले जाणार असल्याची बातमी आली होती. असं खरंच घडणार आहे की ही केवळ एक अफवा आहे, याबद्दल चर्चा रंगली. त्यानंतर आता राष्ट्रपती भवनाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या स्पष्टीकरणात सांगण्यात आले आहे की, असे कोणत्याही चित्रपटाचे व्हीआयपी स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आलेले नाही. राष्ट्रपतींना हा चित्रपट पाहायचा होता, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, सेन्सॉर बोर्डाकडून राष्ट्रपती मुर्मू यांना हा चित्रपट बघायचा आहे असा फोन आला होता. पण पीआयबीने फॅक्ट चेकमध्ये सांगितले आहे की काही चित्रपटांचे स्क्रिनिंग राष्ट्रपती भवनात केले जात असले तरी राष्ट्रपतींना चित्रपट पाहण्याची इच्छा आहे असा त्याचा अर्थ नाही. तसेच राष्ट्रपती या स्क्रीनिंगला उपस्थितही राहणार नाहीत.
11 ऑगस्टला झाला प्रदर्शित
अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला, ज्यात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट गदर १ चा सिक्वेल आहे. या चित्रपटाची पार्श्वभूमी भारताच्या फाळणीवर आधारित आहे. या चित्रपटात अमिषा पटेलने सकीनाची भूमिका साकारली आहे.
बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई सुरूच
चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, देशात गदर-२ ने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त, गदर 2 ने गेल्या 20 वर्षात सर्वाधिक कमाई केली आहे. 15 ऑगस्टला या चित्रपटाने एकूण 55 कोटींची कमाई केली होती.