सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतला हिमाचल प्रदेशातून तिकीट मिळालं आहे. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मायभूमी हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढवण्यासाठी कंगना उत्सुक आहे. आता, कंगनाविरुद्ध या निवडणुकीच्या रिंगणात बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
काँग्रेसकडूनयामी गौतमला तिकीट लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे. हिमाचल प्रदेशातून यामीला तिकीट देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे हिमाचल प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत आणि यामी गौतम आमनेसामने दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या केवळ अफवा असल्याची माहिती हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. त्याबरोबरच हिमाचल प्रदेशातून काँग्रेसच्या उमेदराबाबतही त्यांनी माहिती दिली आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथून कंगना रणौत भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवणार आहे. या भागातून काँग्रेसकडून प्रतिभा सिंह यांना उमेदवारी देण्यात येण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रतिभा सिंह या हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. चंदिगड येथे होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत प्रतिभा सिंह यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.