मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या 'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि प्रिया अल्पावधीतच नॅशनल क्रश बनली. 2018 च्या या चित्रपटातील गाण्यात प्रियाच्या डोळा मारण्याच्या कलेने मन जिंकलं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पाच वर्षांनी प्रियाने या दृश्याबद्दल असं काही सांगितलं आहे, ज्यामुळे दिग्दर्शक उमर लुलू संतापले आहेत.
प्रिया प्रकाश वारियरने तिच्या अलीकडील मुलाखतीत खुलासा केला की 'ओरू अदार लव्ह' चित्रपटातील तिच्या व्हायरल गाण्याच्या दृश्यात डोळा मारण्याची कल्पना तिची होती. 'माणिक्य मलाराया पूवी' या चित्रपटातील गाण्यात प्रियाची विंक स्टाईल लोकांना इतकी आवडली की ती नॅशनल क्रश बनली. मात्र आता प्रियाच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली असून, या अभिनेत्रीच्या दाव्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक उमर लुलू नाराज झाले आहेत.
उमर लुलू यांनी प्रिया प्रकाश वारियरची खिल्ली उडवतानाचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्रिया तिला डोळा मारण्यास सांगितलं असल्याचे सांगताना दिसत आहे. हे शेअर करत उमरने प्रियाला टोमणा मारत लिहिलं की, 'बिचारी मुलगी पाच वर्षांनी विसरली असेल. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वल्ल्यचंदनादी (आयुर्वेदिक औषध) उत्तम आहे. प्रियाचे वक्तव्य आणि लुलू यांचा पलटवार सध्या प्रचंड चर्चेत आहे. यासोबतच चाहतेही यावर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
उमर म्हणाले की, प्रिया आणि रोशनची भूमिका असलेली आणखी दृश्ये ठेवण्यासाठी त्यांना चित्रपटाच्या कथानकात बदल करावा लागला आणि आता तिने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. उमर यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा या मुलांना अशी एखादी गोष्ट मिळते ज्याच्यासाठी ते पात्र नसतात, तेव्हा त्यांना ते समजत नाही.' याला उत्तर देताना प्रियाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती की, 'मी खरं बोलू लागले तर काही लोकांना त्रास होईल.' प्रिया प्रकाश वारियर लवकरच 'कोल्ला' चित्रपटात दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.