Join us

‘फिट’ दिसण्याच्या नादात कलाकारांचा ‘फिटनेस’ का बिघडतोय? 

By संजय घावरे | Published: November 27, 2022 4:17 PM

Celebrity gym-related deaths : वाजवीपेक्षा जास्त अपेक्षांचा कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे....

मागील काही दिवसांपासून कलाकारांच्या स्वास्थ्याशी निगडीत असलेले मुद्दे ऐरणीवर आले आहेत. विनोदवीर राजू श्रीवास्तव, अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांनी मनाला चटका लावत अचानक एक्झीट घेतली. मागच्या आठवड्यात अभिनेता सागर कारंडेची प्रकृती अचानक बिघडल्याने ऐनवेळी दुसऱ्या नाटकाचा प्रयोग करावा लागला. त्यामुळे वाजवीपेक्षा जास्त अपेक्षांचा कलाकारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही सध्या चर्चेचा विषय बनला आहे.कलाकारांच्या बाबतीत एज फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे फिटनेसबाबत जागरूक राहावे लागते. आज हिंदीतील काही आघाडीचे कलाकार पन्नाशीच्या घरात पोहोचूनही मुख्य भूमिका साकारत आहेत. त्या तुलनेत मराठी कलाकार चाळीशीतच साठीतील भूमिका करताना दिसतात.

हिंदी कलाकार कितीही बिझी असले तरी महिन्यातील २०-२२ दिवस काम करतात. उरलेला वेळ ते फिटनेससोबतच कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत घालवतात. काही कलाकार आपल्या क्षमतेपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात आणि आरोग्याची हानी करून घेतात. अतीअपेक्षा खूप घातक ठरत आहेत. प्रत्येकाची क्षमता ठरलेली आहे. त्या पलीकडे जाऊन मिळवण्याचा प्रयत्न घातक ठरत आहेत. यात मग कित्येकदा चुकीचे पाऊल पडते. योग्य सल्ले मिळणे हाही महत्त्वाचा भाग आहे. शॉर्टकटचा मार्ग घातक ठरतो. मनोरंजन विश्वात खूप स्पर्धा असल्याने आरोग्याला घातक जलसी वृत्ती तयार होते. गटबाजीमुळे कुरघोडी करण्याची वृत्ती वाढते. याचाही शरीरावर परिणाम होतो. प्रत्येकाचे राहणीमान भौगोलिक दृष्टिकोनानुसार असते. त्यात बदल करून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले जाते. प्रोटिन्सची मात्रा वाढवण्यासाठी मांसाहाराचे अत्याधिक सेवन केले जाते. डाएट्री सप्लीमेंटसचा मारा केला जातो. याही पुढे जाऊन शरीराला हानिकारक स्टेरॉईड्स घेतले जातात. स्त्रिया स्लीम-ट्रीम दिसण्यासाठी, तर पुरुष सिक्स पॅक्स बनवण्याच्या नादात व्यायामाचा अतिरेक करतात. यांना व्यसनांची जोड मिळाल्यावर आरोग्य निरोगी राहत नाही. 

व्यसन बनले फॅशनआज व्यसन फॅशन बनल्याने निर्व्यसनी व्यक्तीला ग्रुपमध्ये सामील केले जात नाही. त्यामुळे काही जण नाईलाजाने व्यसने करतात आणि पुढे त्यांना सवय लागते. रंगभूमीवरील कलाकारांना संवादफेक करण्यासाठी जास्त एफर्ट घ्यावे लागतात. व्यसनांमुळे त्यांना मर्यादा येतात. यावर मात करण्यासाठी स्वत:चे शरीर आणि जीवनशैलीच्या अनुषंगाने कोणते व्यायाम केले पाहिजेत, हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवले पाहिजे. उंचीनुसार ठरलेल्या वजनाच्या परिमाणानुसार प्रत्येक किलोसाठी एक ग्रॅम प्रोटिन म्हणजे पाच फुटांच्या व्यक्तीला ६५ किलो वजन यानुसार पूर्ण दिवसभरात त्याने ६५ ग्रॅम प्रोटिन्स घेतले पाहिजे. मांसाहारामध्येच प्रोटिन्स मिळतात हा गैरसमज आहे

...........................

चुकीचा सल्ला ऐकून शरीरावर कोणतेही प्रयोग करू नयेत. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतरही स्वत:ला ते कितपत पटते याचा विचार करून पाऊल टाकावे. प्रत्येकाने आपल्या मागच्या जनरेशनला असलेल्या आजारांचा अभ्यास केला पाहिजे. कारण पूर्वजांचे क्रोमोझोन्स प्रत्येक पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. चुकीची जीवनशैली आरंभल्यानंतर ते क्रोमोझोन्स अ‍ॅक्टीव्ह होतात आणि आजार उद्भवतात.- प्रशांत नारकर, फिटनेस एक्सपर्ट............................

अति धावपळीमुळे ऑगस्टमध्ये मी देखील आजारी पडलो होतो. नियमित व्यायाम करूनही मीदेखील आजारी पडतो. त्यामुळे सर्वांनीच प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. व्यायामासोबतच शरीर निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. आता मी ‘बालभारती’चे प्रमोशन करतोय; पण त्यातूनही शक्य तेवढी झोप पूर्ण करतो. मानसिकदृष्ट्या स्वस्थ असलेली व्यक्तीच शारीरिकदृष्ट्याही फिट राहते.- सिद्धार्थ जाधव, अभिनेता..........................

झोप खूप महत्त्वाची...फिटनेस म्हणजे स्वत:ला हेल्दी ठेवणे. यासाठी व्यायामासोबतच योग्य आहार, झोप आणि पाणीही महत्त्वाचे आहे. शरीराची रिकव्हरी करण्यासाठी झोप महत्त्वाची असते. कित्येक कलाकार रात्रंदिवस काम करतात; पण झोपेचा जो कोटा आहे, तो पूर्ण करत नाहीत. त्याचा परिणाम त्यांना नंतर जाणवतो............................

मानसिक फिटनेस आवश्यक...फिझिकल फिटनेससोबतच मेंटल फिटनेसही गरजेचा असतो. काम मिळवण्याच्या शर्यतीत न मिळालेल्या कामाचा मानसिक ताण घेता कामा नये. ४०-५० वयातील कलाकारांनी वयानुसार मोल्ड होणे आवश्यक असते. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे कलाकार ठामपणे उभा असतो. कुटुंबाला वेळ देऊन त्यांच्यासोबत आनंददायी क्षण अनुभवल्याने कलाकारांचे माइंड रिलॅक्स होते आणि ते पुन्हा फ्रेश होतात.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीफिटनेस टिप्स