Join us  

"विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी"; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:28 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने कोहलीच्या 'विराट' विक्रमाबाबत पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

भारताने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करून वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर आणि माजी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने वनडेमधील ५०वं शतक मारत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्यानंतर विराटचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने कोहलीच्या 'विराट' विक्रमाबाबत पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. 

कोहलीने ५०वं शतक मारल्यानंतर सचिनने स्टॅडिंग ओव्हेशन दिली होती. तर कोहलीने हेल्मेट काढून त्याला मैदानातूनच मुजरा केला. कंगनाने इन्स्टाग्रामवरुन कोहलीचा हा स्टेडियममधील व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने सविस्तर पोस्ट लिहिली आहे. "किती अद्भुत!! त्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्यांकडून त्याला कशाप्रकारे मानवंदना मिळावी हा आदर्श विराट कोहलीने आज घालून दिला आहे. त्याची पावलं जिथे पडली त्या जागेची पूजा करायला हवी. तो यासाठी पात्र आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व महान आहे," असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

भारताने सेमी फायनलमध्ये धडक मारल्यामुळे वर्ल्डकपबाबत भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता सगळ्यांचं लक्ष रविवारी(१९ नोव्हेंबर) होणाऱ्या वर्ल्डकप फायनल सामन्याकडे लागलं आहे. वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. २०११ नंतर पुन्हा भारत वर्ल्डकपवर नाव कोरणार का? याबाबत क्रिकेटप्रेमींमध्येही उत्सुकता आहे. 

टॅग्स :कंगना राणौतविराट कोहलीआयसीसी आंतरखंडीय चषकऑफ द फिल्ड