आपल्या प्रेक्षकांना अखंड मनोरंजनाचा पुरवठा करण्याचा ध्यास घेतलेल्या ‘नए इंडिया का ब्लॉकबस्टर मूव्ही चॅनल’ असलेल्या ‘अॅण्ड पिक्चर्स’ने येत्या 18 मार्चपासून रोज रात्री 8.00 वाजता ‘अॅक्शन चित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवात रईस, शिवा- द सुपरहिरो-3, ए फ्लाइंग जाट, जुमानजी- वेलकम टू द जंगल यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे प्रसारण केले जाणार असून त्यात ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअरही सादर केला जाणार आहे.
रईस १८ मार्चला, शिवा- द सुपरहिरो-3 १९ मार्चला, ए फ्लाइंग जाट २० मार्चला तर जुमानजी- वेलकम टू द जंगल २१ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तिगमांशु धुलिया यांच्या ‘साहिब, बीबी और गँगस्टर’ या चित्रपट मालिकेतील ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ हा तिसरा चित्रपट २२ मार्चला दाखवला जाणार आहे. या चित्रपटात एक वाळीत टाकलेला साहेब, त्याची राजकीयदृष्ट्या शक्तिशाली पत्नी आणि लंडनस्थित एक गँगस्टर यांच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले आहे. संजय दत्त, जिमी शेरगिल आणि माही गिल हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून त्याशिवाय चित्रांगदा सिंह, सोहा अली खान, कबीर बेदी, नफिसा अली आणि दीपक तिजोरी या कलाकारांच्या त्यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर शुक्रवार, २२ मार्चला आठ वाजता होणार आहे.
या चित्रपटाचा आधीचा भाग जिथे संपला, तिथपासून ‘साहिब, बीबी और गँगस्टर-3’ च्या कथानकाला प्रारंभ होतो. पूर्वीच्या काळातील संस्थानिक असलेला आदित्य प्रतापसिंह (जिमी शेरगिल) आणि त्याची पत्नी महाराणी माधवी देवी (माही गिल) हे एकमेकांविरोधातच कट-कारस्थाने रचत असतात. आधीच्या भागात आदित्यला अटक करून तुरुंगात जावे लागलेले असते. पण या भागाच्या प्रारंभी तो तुरुंगातून सुटून परततो आणि आपला राजकीय वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात सूडाची आग धगधगत असते. त्यातच कथानकात कबीरचा (संजय दत्त) प्रवेश होतो. कबीरचे खरे नाव उदय प्रताप सिंह असून तो राजस्थानातील एक माजी संस्थानिक आणि आदित्य प्रतापसिंहाचे वडील राजा हरी सिंह (कबीर बेदी) यांनी टाकून दिलेला मुलगा असतो. त्याचा भाऊ विजय (दीपक तिजोरी) असतो. आता तब्बल २० वर्षांनंतर त्याच्या घरी परतण्याच्या बातमीने शाही परिवारात एकच गोंधळ माजतो. आदित्य आणि उदय यांची भेट होते आणि मग सुरू होतो रशियन रुलेटचा चकवा देणारा खेळ. या तिन्ही चित्रपटांच्या कथा भिन्न असल्या तरी त्यातील व्यक्तिरेखांमधील प्रेम, सूड, राजकारण आणि विश्वासघात वगैरे भावना कायमच आहेत.