Javed Akhtar : प्रसिद्ध लेखक आणि संगीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या लेखन कौशल्यामुळे ओळखले जातात. देशातील सर्वोत्तम लेखकांपैकी ते एक आहेत. त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक केलं जातं. जावेद अख्तर यांच्या आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांसाठी लेखन केलं आहे. शिवाय काही चित्रपटांची गाणीही त्यांनी लिहली आहेत. असं असलं तरी जावेद अख्तर यांनी करण जोहर यांच्या 'कुछ कुछ होता है' या बहुचर्चित सिनेमासाठी लेखन करण्यास नकार दिला होता. यामागे काय कारण होतं? याचा खुलासा त्यांनी केला आहे.
सपन वर्मा यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये जावेद अख्तर यांनी आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाच्या वेळचा देखील एक किस्सा सांगितला.
जावेद अख्तर यांनी का नाकारला सिनेमा-
चित्रपटासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "८० च्या दशकात हिंदी चित्रपटांसाठी अनुकूल वातावरण नव्हतं. त्यावेळी चित्रपटासाठी लोक डबल मिनिंग गाणं लिहित होते, ज्याला काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे मी अशा पद्धतीच्या चित्रपटांसाठी काम करायचं नाही असं ठरवलं होतं".
पुढे ते म्हणाले," या माझ्या तत्वांवर मी ठाम होतो. त्यामुळेच मी 'कुछ कुछ होता है' या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. 'कुछ कुछ होता है' मधील 'कोई मिल गया, मेरा दिल गया' हे मी लिहलेलं गाणं रेकॉर्डेड होतं.पण, जेव्हा करणने सिनेमाचं नाव घोषित केलं ते मला मान्य नव्हतं. तेव्हा मी म्हटलं 'कुछ कुछ होता है' म्हणजे नक्की काय होतंय? खरंतर चित्रपटाचं हे टायटल मला आवडलं नव्हतं त्यामुळे मी नकार दिला. परंतु माझ्या त्या निर्णयाचा मला आजही पश्चाताप होतोय".
करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला. साल १९९८ मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. अभिनेता शाहरुख खान, काजोल तसेच राणी मुखर्जी यांसारख्या कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळाली.