Join us

यामी गौतमच्या लेकाच्या नावाची झाली चर्चा, 'वेदविद'चा अर्थ सांगत अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 2:18 PM

आदित्य धर आणि यामी गौतमने मुलाचं नाव 'वेदविद' असं ठेवलं आहे. या युनिक नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती.

अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला. दिग्दर्शक आदित्य धर आणि यामी गौतम आईबाबा झाले. त्यांच्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली. आई झाल्यानंतर यामी गौतमने पहिल्यांदाच मुलाखत दिली. यावेळी तिने लेकाच्या नावाचा अर्थ सांगितला. तसंच आयुष्यात काय काय बदल झालेत यावरही भाष्य केलं.

आदित्य धर (Aditya Dhar) आणि यामी गौतमने मुलाचं नाव 'वेदविद' असं ठेवलं आहे. या युनिक नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. आता याचा अर्थ सांगत यामी म्हणाली, "वेदविद हे भगवान शंकर आणि भगवान विष्णूचं नाव आहे. तसंच वेदविद म्हणजे असा ज्याला सगळे वेद माहित आहेत तो त्यात पारंगत आहे." त्यामुळे त्याच्यावर खूप दबाव आहे असं यामी गंमतीत म्हणाली. मी आणि आदित्य रोज लेकाला काहीतरी नवीन टोपणनाव देत असतो. पण एक नाव जे मनात कायम राहिलं आहे ते म्हणजे JD(Junior Dhar). मी प्रेग्नंट असताना आम्ही सिनेमा पाहत होतो तेव्हा माझा भाऊ ओजसने हे नाव सुचवलं. मला ते आवडलं. सगळे म्हणाले, मुलगी झाली तर? तो म्हणाला, 'तरी सुद्धा ज्युनिअर धरच.' मग आम्ही सगळे हसलो.

आयुष्यातील बदलांविषयी यामी म्हणाली, "मला खरंच अजूनही विश्वास बसत नाही की मी आई झाले आहे. विशेषत: जेव्हा मला वेदविद माझा मुलगा अशी ओळख करुन द्यावी लागते तेव्हा मी ते खूप जोरात बोलते. मला आठवतंय हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर सगळेच बाळाला पाहण्यासाठी आतुर होते. हे सगळ्याच कुटुंबात असतं. तेव्हा मी आदित्यच्या बाजूला बसले आणि म्हणाले की कसं सांगू कळत नाही पण असं वाटतंय की या क्षणापूर्वी माझं आयुष्य एकदम ब्लर होतं. तुम्ही फक्त बाळाला जन्म देत नाही तर तुमचाही नवा जन्म होतो. हे अतिशयोक्ती वाटेल पण मला त्या क्षणी भावनिक, मेंटली, शारिरिकत्या सगळं बदलल्याचं जाणवलं."

टॅग्स :यामी गौतमपरिवारबॉलिवूड