१९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात घडणारा केजीएफ: चॅप्टर वन हा पीरियड ड्रामा प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटात प्रेक्षकांना एका अनाथ मुलाची कथा पाहायला मिळाली होती. अप्रतिम कथा, नेत्रसुखद दृश्ये आणि कलावंतांच्या अभिनयामुळे देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर या कन्नड भाषेतील चित्रपटाने राज्य केले. या चित्रपटाच्या फॅन्ससाठी आता एक खूप चांगली बातमी आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या यश ऊर्फ नवीन कुमार गौडानेच सोशल मीडियाद्वारे ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे.
यशने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे केजीएफ: चॅप्टर टू या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असल्याचे सांगितले आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता केजीएफ: चॅप्टर टू डबल धमाका करण्यास सज्ज झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आम्हाला नितांत गरज आहे.
केजीएफ: चॅप्टर टू या चित्रपटाच्या सगळ्या टीमने बंगलूरूमधील विजय नगर येथील कोंडाराम या देवळात दर्शन घेऊन या नव्या चित्रपटाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटाचे निर्माते विजय किरगंदूर यांनी ट्वीट करून याविषयी सांगितले आहे. देवाच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही केजीएफ: चॅप्टर टू या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करत असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.
प्रशांत नील यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटातील स्टारकास्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सुपरस्टार यश यात प्रमुख भूमिकेमध्ये होता तर श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला होता. केजीएफ: चॅप्टर वनची कथा कोलर गोल्ड फील्ड्समधील अत्याचारी प्रशासकांविरुद्ध दिलेल्या लढ्याभोवती फिरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. या लढ्याचे नेतृत्व करणारा माणूस त्याच्या आईने मृत्यूसमयी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक धोकादायक मार्ग स्वीकारतो. ही इच्छा असते त्याला श्रीमंत, शक्तिशाली आणि समृद्ध झालेले बघण्याची. त्याच्या आईने मृत्यूपूर्वी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला त्याची नैतिकता आणि महानता कायम राखण्यात मदत होते.