यश चोप्रा आज आपल्यात नाहीत. पण यश चोप्रांचे सिनेमे मात्र कुठलाच बॉलिवूडप्रेमी विसरू शकत नाही. यश चोप्रा यांना रोमान्सचा किंग म्हटले जाते. इत्तेफाक, दाग, लम्हे, चांदनी, दिल तो पागल है, वीरलारा असे अनेक चित्रपट त्यांनी दिले. १९३२ साली आजच्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला यश चोप्रा यांचा जन्म झाला होता. चारदा फिल्मफेअर बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार पटकावणारे यश चोप्रा आणि शाहरूख खान या जोडीने दीर्घकाळ बॉलिवूड गाजवले. कदाचित यश चोप्रा नसते तर शाहरूख आज इतका मोठा स्टार नसता. यश चोप्रा दिग्दर्शित डर, दिल तो पागल है, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे, मोहब्बतें, वीर जारा, रब ने बना दी जोडी, जब तक है जान यासारख्या चित्रपटांत शाहरूखने काम केले. शाहरूख हा यश चोप्रांचा आवडता अभिनेता होता. पण एकेकाळी हाच शाहरूख यश चोप्रा यांना जराही आवडायचा नाही.
होय, डर चित्रपटासाठी त्यांनी शाहरूखला सार्ईन तर केले. पण त्यावेळी शाहरूख त्यांना अजिबात आवडत नसे. यश चोप्रांनी शाहरूखच्या किंग अंकल या चित्रपटाचे काही फुटेज पाहिले होते, जे त्यांना आवडले नव्हते. पण शाहरूखला साईन करणे त्यांची एकप्रकारे ‘मजबुरी’ होती. कारण अन्य कुठलाच अभिनेता हा निगेटीव्ह रोल करायला तयार नव्हता. डर या चित्रपटात यश चोप्रा व शाहरूख यांनी प्रथम काम केले. पण या पहिल्याच चित्रपटातील शाहरूखचे काम पाहून यश चोप्रा कमालीचे प्रभावित झालेत. पुढे तर त्यांची चांगली गट्टीचं जमली.