कन्नड फिल्म 'केजीएफ'मुळेयश या अभिनेत्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. याआधी त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण केजीएफमुळे त्याला जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. केजीएफ चॅप्टर १ मधील 'अँग्री यंग मॅन'च्या भूमिकेमुळे त्याला 'मिलेनियल अँग्री यंग मॅन' म्हणून संबोधण्यात येऊ लागले आहे.
यशच्या चाहत्यांनी आणि प्रशंसकांनी त्याचा वाढदिवस देखील त्याच्या स्टारडमला साजेशा असा शानदार पद्धतीने साजरा केला होता. यावेळी यशचे भव्य असे विशाल कटआउट आणि पाच हजार किलोचा केक कापण्यात आला. या सुपरस्टाराविषयी त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाचा हा पुरावा आहे.
प्रशांत नील यांचे लेखन आणि दिग्दर्शन लाभलेल्या केजीएफ: चॅप्टर वन या चित्रपटातील स्टारकास्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सुपरस्टार यश यात प्रमुख भूमिकेमध्ये होता तर श्रीनिधी शेट्टी, रामचंद्र राजू यांच्यासह मौनी रॉयनेही या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला होता.
केजीएफ: चॅप्टर वनची कथा कोलर गोल्ड फील्ड्समधील अत्याचारी प्रशासकांविरुद्ध दिलेल्या लढ्याभोवती फिरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. या लढ्याचे नेतृत्व करणारा माणूस त्याच्या आईने मृत्यूसमयी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी एक धोकादायक मार्ग स्वीकारतो. ही इच्छा असते त्याला श्रीमंत, शक्तिशाली आणि समृद्ध झालेले बघण्याची. त्याच्या आईने मृत्यूपूर्वी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला त्याची नैतिकता आणि महानता कायम राखण्यात मदत होते.