बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि कतरिना कैफ त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर 12 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून भाईजानच्या दबंगबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. जर तुम्हाला 'टायगर ३' चित्रपटाचा आनंद घ्यायचा असेल आणि तोही कमी किमतीत तर आम्ही तुमच्यासाठी एक कामाची बातमी घेऊन आलो आहोत.
अत्यंत कमी तिकिट दरात तुम्हाला 'टायगर 3' सिनेमा पाहता येणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडकडून नुकतेच 'पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट' लॉन्च करण्यात आले आहे. याचे सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही 699 रुपयांमध्ये 10 चित्रपट पाहू शकणार आहात. मात्र, यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल. PVR ने या योजनेची माहिती त्यांच्या अधिकृत X खात्यावर शेअर केली आहे.
जर आपण नियम आणि अटींबद्दल बोललो, तर पीव्हीआर वेबसाइटनुसार, पासपोर्ट योजनेअंतर्गत सोमवार ते गुरुवार या कालावधीतच चित्रपट पाहता येणार आहेत. पासची वैधता फक्त 30 दिवस आहे, याचा अर्थ या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला एका महिन्यात सर्व 10 चित्रपट पहावे लागतील. PVR वेब किंवा अॅपद्वारे एका दिवसात फक्त एक तिकीट खरेदी करता येते. तिकिटाची किंमत केवळ 350 रुपयांपर्यंत असू शकते. यापेक्षा जास्त तिकीट असल्यास उर्वरित रक्कम भरावी लागेल. दक्षिण भारतातील चित्रपटगृहांचा या योजनेत समावेश नाही.
'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे. तसंच यामध्ये वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सची झलक आहे. यामध्ये शाहरुख खान 'पठाण' बनून आणि हृतिक रोशन 'वॉर' चा कबीर बनून टायगरची मदत करताना दिसणार आहेत. मनिष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' चा रन टाईमही मेकर्सने वाढवला आहे.