नवी दिल्ली - दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय आणि बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारे अभिनेते प्रकाश राज नेहमीच आपलं परखड मत मांडतात. अनेकदा थेट केंद्र सरकारला लक्ष्य करत ते प्रखर शब्दात टीकाही करतात. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन यापूर्वी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जाहीरपणे टीका केली होती. अनेकदा त्यांच्या टीकेचं समर्थन आणि विरोध करणारे दोन गट पाहायला मिळतात. मात्र, राज यांनी चांद्रयान ३ मोहिमेला अनुसरून एक ट्विट केलंय. त्यावरुन, नेटीझन्सने त्यांना चांगलंच ट्रोल केलंय. आता, या ट्रोलर्संना त्यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला विनोद कळलाच नसल्याचं म्हटलंय.
राजकीय मुद्दयांवर भाष्य केल्याने प्रकाश राज चर्चेत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही होतात. राज यांनी 'चंद्रयान 3' (Chandrayan 3) ची खिल्ली उडवणारं ट्वीट केल्याचं आरोप करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र, हे ट्विट चंद्रयान ३ मोहिमेची खिल्ली उडवणारे नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, या ट्विटमागील विनोदाचा संदर्भही सांगितला आहे.
द्वेष फक्त द्वेष पाहतो.. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमचा केरळ चहावाला साजरा करत होतो.. ट्रोलर्संनी कोणता चहावाला पाहिला??, असा सवालही प्रकाश राज यांनी विचारला आहे. तसेच, जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर तुम्हीच एक विनोद आहात. GROW UP #justasking, असे म्हणत राज यांनी ट्रोलर्संना स्पष्टीकरण देत चांगलंच सुनावलं आहे.
'चंद्रयान 3'ने अवकाशात झेप घेतल्यावर सर्वच भारतीयांना गर्व वाटला. २३ ऑगस्ट रोजी 'चंद्रयान 3' चंद्रावर प्रवेश करणार आहे. आतापर्यंत विक्रम लँडरने काही फोटोही पाठवले आहेत. प्रकाश राज यांनी मात्र भारतीय वैज्ञानिकांच्या या यशाची जणू खिल्लीच उडवल्याच नेटीझन्स म्हणतात. त्यांनी ट्वीट करत लिहिले, 'ब्रेकिंग न्यूज! हे बघा विक्रम लँडरने पाठवलेली चंद्राची पहिली झलक. वॉव!' यासोबतच त्यांनी हातात चहाची किटली घेतलेल्या एका माणसाचा कार्टुन फोटो जोडला आहे, ती व्यक्ती चंद्रयान २ मोहिमेस लीड करणाऱ्या सीवन यांचा असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 'चंद्रयान 3' शेवटच्या टप्प्यात पोहोचलं आहे. २३ ऑगस्टला ते चंद्रावर प्रवेश करेल अशी आशा सर्वांनाच आहे. सगळ्या भारतीयांचं त्याकडे लक्ष लागलं आहे.
ट्विटरवरुन नेटीझन्सचा संताप
प्रकाश राज यांचं हेच ट्वीट नेटकऱ्यांच्या अजिबात पसंतीस पडलेलं नाही. चहावाल्याचं ते कार्टून म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधल्याचं दिसतंय. यासोबतच त्यांनी 'चंद्रयान 3' चीही खिल्ली उडवली आहे. 'कोणाची इतकीही निंदा करु नका की ती देशाची निंदा केल्यासारखं दिसेल' अशी कमेंट करत एका युझरने प्रकाश राज यांना सुनावलं आहे. 'तुमचं नाव प्रकाश आहे पण अर्थ अंधारात आहे', 'तुम्ही इतकी खालची पातळी गाठली आहे की देशवासी म्हणण्यचीही लाज वाटत आहे. आम्हाला इस्रोचा अभिमान आहे..जय हिंद' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.