अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. खऱ्या आयुष्यात या प्रतिभावंत बॉलिवूड अभिनेत्रीने हवामान बदल आणि शाश्वत जीवनशैलीची गरज यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वाहून घेतले आहे. भूमीची सध्या इन्स्टाग्रामवर मुलाखतींची एक मालिका सुरू आहे. यामध्ये ती छोट्या हवामान योद्ध्यांसोबत गप्पा मारताना दिसते आहे. याचा भाग म्हणून भूमीने ११ वर्षीय काव्या मजुमदारशी संवाद साधला.
लोकांना अधिक शाश्वत पद्धतीने जगून पृथ्वीच्या रक्षणात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणारे ‘नज’ नावाचे एक अॅप काव्याने विकसित केले आहे. या अॅपमध्ये काही काळजीपूर्वक निवडलेली आव्हाने आहेत. ही आव्हाने यूजर्सना ऊर्जा व पाण्याची बचत करण्यास, पुनर्वापर व रिसायकलिंगला प्रोत्साहन देण्यास, आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्यास तसेच वाया जाणारे अन्न व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यास प्रेरणा देतात. काव्या मजुमदारने व्हाइटहॅट ज्युनियरमध्ये कोडिंग शिकत असून, तेथील तिच्या प्रकल्पाचा भाग म्हणून तिने ‘नज’ हे वर्तनात्मक अर्थशास्त्रातील नज सिद्धांतवर आधारित अॅप विकसित केले आहे. नज सिद्धांतामध्ये सकारात्मक सशक्तीकरण आणि अप्रत्यक्ष सूचना यांचा उपयोग करून व्यक्तीच्या वर्तनावर व निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकला जातो.