कुणी त्याला बादशाह म्हणतं तर कुणी रोमान्सचा किंग… आम्ही बोलतोय चित्रपटसृष्टीचा अभिनेता शाहरुख खानबद्दल… आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळेच रसिकांनी त्याला बादशाह आणि किंग अशी उपाधी दिली. हाच किंग संपत्तीबाबतही खराखुरा किंग आहे.
एका इंग्रजी वेबवसाईटनुसार शाहरुखची एकूण संपत्ती सुमारे ४१ अब्ज ६३ कोटी रुपयांच्या घरात आहे. शाहरुख वांद्रे इथल्या ज्या बंगल्यात राहतो त्या आलिशान मन्नत बंगल्याची किंमत जवळपास २०० कोटीच्या घरात आहे. अभिनय क्षेत्रात सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल करणारा शाहरुख खान आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. त्याच्याकडे 'मन्नत' सारखा आलिशान बंगला आहे. तसे, 'अमृत' हे शाहरुखचे मुंबईतील पहिले घर आहे जिथे तो सुरुवातीला पत्नी गौरीसोबत राहत होता.
शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याचे इंटीरियर त्याची पत्नी गौरी खानने स्वतः डिझाइन केले आहे. गौरीला मन्नतचे इंटिरिअर डिझाईन करण्यासाठी चार वर्षांहून अधिक कालावाधी लागला होता. इंटिरिअर करुन झाल्यानंतर या बंगल्याचे नाव 'मन्नत' असे देण्यात आले. मन्नतला खास डिझाईन करण्यासाठी गौरीनेही प्रचंड मेहनत घेतली आहे.
दुबईमध्ये शाहरुखचा ‘व्हिला के ९३’ हा बंगला आहे तर लंडनमधील पार्क लेन इथंसुद्धा त्याचं घर आहे. ही संपत्ती जवळपास १६७ कोटी रुपयांची आहे. शाहरुखकडे बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. यांत ‘ऑडी A6’, ‘बीएमडब्ल्यू i8’, ‘बीएमडब्ल्यू 7 सीरिज’, ‘हार्ले डेव्हिडसन डायना स्ट्रीट बॉब’ ‘बेंटली कॉन्टिनेंटल जीटी’ अशा गाड्यांचा समावेश आहे.बादशाहला साजेसेच आलिशान आयुष्य तो जगतो.