Join us

'बिग बॉस' फेम एल्विश यादवला अटक, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:41 PM

एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामागचं कारण समोर आलंय

प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवला पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर 113 मधून अटक केली आहे. नोएडा येथे आयोजित रेव्ह पार्टीमध्ये बेकायदेशीरपणे सापाचे विष पुरवल्याप्रकरणी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादववर पार्टी आणि क्लबमध्ये सापाचं विष पुरवल्याचा आरोप आहे.

सापाचं विष पुरवणं हा भारतात कायदेशीर गुन्हा आहे. पोलिसांनी त्याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एल्विशची यापूर्वीही एकदा चौकशी केली आहे. पण पोलीस एल्विशच्या उत्तराने समाधानी नाहीत. अशा परिस्थितीत नोएडा पोलिसांनी एल्विशला बेड्या ठोकल्या आहेत. एल्विशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने हा निर्णय दिलाय.

काही दिवसांपुर्वी एल्विश यादवने युट्यूबर मॅक्सर्टनला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सेक्टर-53 येथील साऊथ पॉइंट मॉलमध्ये एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांनी मॅक्सर्टनवर प्राणघातक हल्ला केला होता. आता रेव्ह पार्टीचं प्रकरण एल्विशला चांगलंच भोवणार असं दिसतंय. एल्विशला बेड्या ठोकल्यावर पोलिस त्याच्यावर पुढे कोणती कारवाई करणार,  याकडे सर्वांचं लक्ष असेल.

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटीपोलिस