Join us

Dilip Kumar Died: युसूफ खान ते दिलीप कुमार...असा होता ट्रॅजेडी किंगचा बॉलिवूडमधील प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 8:16 AM

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना खारच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. (Dilip Kumar passed away. ) अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात अभिनयाचे विद्यापीठ अशा शब्दांत गौरवलेले तसेच ट्रॅजेडी किंग म्हणून प्रचलित असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे मुळचे पाकिस्तानमधील पेशावरचे. या शहरातील क्‍युसा खवानी बाजारातील पास्तुन कुटुंबात 11 डिसेंबर, 1922 साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांचे वडील लाला गुलाम सरवर पेशावर व देवलाली येथील प्रसिद्ध फळविक्रेते होते.

असा मिळाला पहिला ब्रेक...दिलीप कुमार यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील देवलाली येथील प्रेस्टिजियस बर्नेस शाळेत झाले. 1930 साली त्यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. 1940मध्ये दिलीप कुमार पुण्यातील एका कॅन्टीनचे मालक व फळविक्रेते होते. 1943साली बॉम्बे टॉकिजचे मालक आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री देविका राणी आणि तिचा पती हिमांशु राय यांनी पुण्यातील सैन्य कॅन्टीनमध्ये दिलीप कुमार यांना पाहिले आणि त्यांनी 1944 सालातील ज्वार भाटा या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी दिलीप कुमार यांची निवड केली. हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट असून त्यानंतर त्यांनी कधीच पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

युसुफ खानचे झाले दिलीप कुमार...ज्वारा भाटा चित्रपटाचे लेखक भगवतीचरण वर्मा यांनी त्यांचे युसुफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार केले आणि तेव्हापासून ते दिलीप कुमार या नावाने ओळखू लागले. त्यांच्या ज्वार भाटा या चित्रपटाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले नाही. मात्र 1949 साली प्रदर्शित झालेल्या जुगनू या चित्रपटात त्यांनी नूरजहॉं यांच्यासोबत काम केले होते आणि त्यांचा हा पहिला गाजलेला चित्रपट ठरला.

ट्रॅजेंडी किंग या नावाने संबोधू लागले...त्यानंतर त्यांचा साहेब (1948) चित्रपटाने देखील बॉक्‍स ऑफिसवर कमाल दाखवली. 1949 साली महमूद खान दिग्दर्शित अंदाज चित्रपटात राज कपूर व नरगिस यांच्यासोबत लव ट्राएंगलमध्ये ते दिसले. त्यानंतर त्यांनी जोगन (1950), दीदार(1951), दाग(1952), देवदास(1955), यहुदी (1958) आणि मधुमती (1958) यासारख्या त्रिकोणी प्रेमकथेवर आधारीत असलेल्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांना ट्रॅजेडी किंग या नावाने संबोधू लागले.दाग (1952) चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा पुरस्कार त्यांना देवदास (1955) चित्रपटासाठी प्राप्त झाला. त्याकाळातील सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत त्यांनी काम केले होते, या यादीत नरगिस, कामिनी कौशल, मीनाकुमारी, मधुबाला व वैजयंती माला या अभिनेत्रींचा समावेश आहे.

ट्रॅजेडी किंगची इमेज पुसून काढण्यासाठी केल्या या भूमिकादिलीप कुमारने ट्रॅजेडी किंगची इमेज पुसून काढण्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्‍टरचा सल्ला घेऊन स्वच्छ प्रतिमा असलेली एका आक्रमक शेतकऱ्याची भूमिका आन (1952) चित्रपटात निभावली आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानंतर अंदाज (1955), नया दौर (1957) आणि कोहिनूर (1960) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. कोहिनूर चित्रपटातील भूमिकेसाठी पुन्हा एकदा फिल्मफेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 1960 साली के. आसिफ यांची मोठ्या बजेटचा ऐतिहासिक चित्रपट मुगल-ए-आजममध्ये राजकुमार सलीमची भूमिका निभावली होती आणि यात मधुबालाने दासी पुत्रीची भूमिका केली होती. त्याकाळात या चित्रपटातील जास्त भाग ब्लॅक ऍण्ड व्हाइटमध्ये चित्रीत केले होते. केवळ एक भाग रंगीतमध्ये शूट केला होता. चित्रपट बनल्यानंतर तब्बल 44 वर्षांनंतर हा चित्रपट 2004साली रंगीत व्हर्जनमध्ये तयार करून 2008 साली पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आणि हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात हिट चित्रपट ठरला.

1970 सालानंतर जीवनात आले अनेक चढउतार...1961 साली दिलीप कुमार गंगा जमुना चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. यात त्यांचा भाऊ नासिर खान मुख्य भूमिकेत होता. 1962 साली ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लेन यांच्या लॅरिश ऑफ अरबिया चित्रपटातील शरीफ अलीच्या भूमिकेसाठी त्यांना विचारण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला होता.1964मधील लीडर चित्रपटात उमर शरीफची भूमिका त्यांनी साकारली होती, मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. 1967 साली राम और श्‍याम चित्रपटात ते दुहेरी भूमिकेत दिसले होते. 1970 सालानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले आणि 1980 मधील त्यांचे बरेचसे चित्रपट फ्लॉप ठरले होते. दास्ता (1972), बैराग (1976), गोपी (1970) आणि बंगाली चित्रपट सगीना महतो (1970) हे चित्रपट चालले नाहीत. त्यानंतर 1976 ते 1980 काळात चित्रपटातून ब्रेक घेतला होता.

1981 साली पुन्हा केले सिनेइंडस्ट्रीत कमबॅक1981 साली क्रांती चित्रपटातून त्यांनी पुन्हा सिनेइंडस्ट्रीत पुनरागमन केले आणि हा चित्रपट त्या वर्षातील सुपरहीट ठरला. 1982 साली सुभाष घई यांच्या विधाता चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका केली होती. रमेश सिप्पी यांच्या शक्ती चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी 1984 साली फिल्म फेयरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1984 दिलीप कुमार यांनी रमेश तलवार यांच्या दुनिया आणि यश चोप्रा यांच्या मशाल चित्रपटात काम केले. 1996 मध्ये सुभाष घई यांच्या कर्मा चित्रपटात काम केले आणि 1991मध्ये राजकुमार यांच्यासोबत दुसऱ्यांदा आणि सुभाष घई यांच्यासोबत सौदागर या चित्रपटात काम केले आणि हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. 1993 साली त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

दिलीप कुमार यांची जास्त गाणी मोहम्मद रफी यांनी गायली होती. 1958 सालानंतर तलत महमूद आणि मुकेश यांनीसुद्धा त्यांच्यासाठी काही गाणी गायली. किशोर कुमार यांनी 1974 साली सगीना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया हे गाणे गायले होते आणि हे गाणे खूप गाजले.

दादासाहेब फाळके पुरस्कार...

दिलीप कुमार राज्यसभेचे सदस्य होते. 1994 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यांना पाकिस्तानातील सर्वात मोठा पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित करण्यात आले. दिलीप कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत जास्त पुरस्कार प्राप्त केल्याचा विश्‍वविक्रम नोंदविला आहे.

22 वर्षे लहान सायरा बानोसोबत केले लग्न

दिलीप कुमार बरेच वर्षे अभिनेत्री मधुबालासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यांना लग्नदेखील करायचे होते. मात्र त्यांच्या घरातून विरोध केला होता. 1980 साली दिलीप कुमार यांनी आसमा यांच्यासोबत लग्न केले, मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर 1996 साली त्यांनी त्यांच्यापेक्षा 22 वर्षे लहान सायरा बानो यांच्यासोबत लग्नबेडीत अडकले होते आणि सायरा बानू यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. 

टॅग्स :दिलीप कुमारसायरा बानू