मंगळवारी रात्री उशीरा अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याची बातमी आली आणि बॉलिवूडसह संजूबाबाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. संजयचा कॅन्सर तिस-या स्टेजवर पोहोचला आहे. प्रत्येकजण त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतोय. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेसंजय दत्तसाठी एक ट्वीट केले. संजय दत्त तू फाइटर आहे आणि फाइटर राहशील, अशा शब्दांत युवीने संजयला धीर दिला.
युवीने लिहिले, ‘संजय दत्त तू खरा लढवय्या आहेस आणि नेहमी राहशील. मी यातून गेलोय, याच्या वेदना मी सोसल्या आहेत. पण मला माहित आहे, तू एक खंबीर व्यक्ती आहेस आणि या कठीण काळातून बाहेर पडतील. तू लवकर बरा व्हावास, यासाठी प्रार्थना करतोय.’तुम्हाला माहित आहेच की, युवराजला 2011 च्या वर्ल्ड कपदरम्यान कॅन्सरने ग्रासले होते. मात्र युवी धीराने या आजाराला सामोरा गेला आणि त्याने या आजाराला मात दिली.
संजय दत्तला गेल्या 8 तारखेला श्वसनास त्रास होत असल्यामुळे लीलावती रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याची कोरोना टेस्टही करण्यात आली होती. पण ती टेस्ट निगेटीव्ह आली. यानंतर 10 तारखेला त्याला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र दुस-याच दिवशी म्हणजे 11 तारखेला त्याला कॅन्सर झाल्याची बातमी आली आणि सगळेच हादरले. चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी संजयला कॅन्सर झाल्याचा खुलासा केला. संजयचा कॅन्सर तिस-या स्टेजला पोहोचल्याने लवकरच तो याच्या उपचारासाठी विदेशात रवाना होणार असल्याचे कळतेय.