प्रख्यात तबलावादक झाकीर हुसेन याचे रविवारी (१५ डिसेंबर) निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना त्यांनी मंत्रमुग्ध केलं होतं.संगीतकार आणि तालतज्ज्ञ, जागतिक पातळीवरचे ख्यातकीर्त झाकीर हुसेन यांच्या निधनाने कधीही भरुन न निघणारी पोकळी कलाविश्वात निर्माण झाली आहे.
झाकीर हुसेन यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा होता. ते सोशल मीडियावरही सक्रिय असायचे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करायचे. झाकीर हुसेन यांनी ऑक्टोबर महिन्यात इन्स्टाग्रामवरुन परदेशातील एक व्हिडिओ शेअर केला होता. फेरफटका मारायला गेलेल्या झाकीर हुसेन यांनी या व्हिडिओतून परदेशातील सुंदर निसर्गदृश्य दाखवलं होतं. हीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हुसेन यांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने गेल्या आठवड्यातच सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात होते, अशी माहिती त्यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी कथक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला, मुली अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, भाऊ तौफिक कुरेशी, फजल कुरेशी आणि जगभरात विखुरलेला शिष्य परिवार आहे.