बॉलिवूडची बार्बी गर्ल अर्थात कतरिना कैफ (katrina kaif) हिचे आज लाखो चाहते आहेत. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर कतरिनाने कलाविश्वात हक्काचं स्थान मिळवलं. त्यामुळेच बॉलिवूडच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत कतरिनाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. मात्र, 'कतरिनामुळे मला इंडस्ट्रीमध्ये संधी मिळालीच नाही', असा आरोप एका लोकप्रिय अभिनेत्रीने केला आहे.
'वीर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये (bollywood) पदार्पण करणारी झरीन खान (zareen khan) साऱ्यांनाच आठवत असेल. सलमान खानने झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. झरीन मोजून काही मोजक्याच सिनेमांमध्ये झळकली. परंतु, यात बऱ्याचदा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूकची चर्चा रंगली. झरीन कतरिनाची कार्बन कॉपी असल्याचं म्हणत अनेकांनी तिची तुलना केली. याविषय़ी झरीन Reddit वर ‘आस्क मी एनीथिंग’ या सेशनमध्ये व्यक्त झाली आहे.
"सुरुवातीपासून इंडस्ट्रीमध्ये तुझी आणि कतरिनाची तुलना केली जाते. याविषयी तुला कसं वाटतं? आणि त्यामुळे रुपेरी पडद्यावर त्याचा काही परिणाम झाला का?" असा प्रश्न एका चाहत्याने झरीनला विचारला. त्यावर, उत्तर देत 'कतरिनामुळे मला संधी मिळाली नाही', असं ती म्हणाली.
नेमकं काय म्हणाली झरीन?
बॉलिवूडमध्ये ज्यावेळी मी आले त्यावेळी मी एखाद्या हरवलेल्या मुलासारखी होते. माझ्याकडे कोणत्याही सिनेमा अनुभव नव्हता. सुरुवातीला जेव्हा माझी तुलना कतरिनासोबत केली जायची त्यावेळी मला आनंद व्हायचा. कारण, मी सुद्धा तिची चाहती आहे. मला ती आवडते. पण, त्याचा माझ्या करिअरवर खूप परिणाम झाला. कारण, या इंडस्ट्रीमध्ये लोकांनी मला माझं व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधीच दिली नाही, असं झरीन म्हणाली.
दरम्यान, झरी ‘वीर’नंतर ‘रेडी’ आणि ‘हाऊसफुल २’ या सिनेमांमध्ये झळकले. परंतु, तिला फारसं यश आलं नाही. त्यानंतर ती काही म्युझिक अल्बममध्येही झळकली. झऱीन सध्या कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर तिचा चांगला वावर आहे.