बॉलिवूडची ग्लॅमरस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर त्यांनी ८० चा काळ गाजवला.विशेष म्हणजे आजही त्यांचे सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. त्याकाळच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये झीनत यांचं नाव अग्रस्थानावर घेतलं जातं. विशेष म्हणजे आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी यश, संपत्ती,प्रसिद्धी सारं काही मिळवलं. मात्र, असं असतानाही त्या आजही एखाद्या पार्टीत जाताना भाड्याने विकत घेतलेले कपडे वापरतात. हो. अनेकांना आश्चर्य वाटेल पण हा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.
काही दिवसांपूर्वीच झीनत अमान यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. तेव्हापासून त्या सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय झाल्याचं पाहायला मिळतं. यात काही ना काही पोस्ट शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अलिकडेच त्यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्या कपडे आणि दागिने लोकांकडून उधारीवर मागून वापरतात असा खुलासा केला.
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलंदेखील दिसून येत आहेत. यात त्यांनी निळ्या रंगाचा शरारा परिधान केला आहे. या शराराविषयी त्यांनी एक खुलासा केला. हा शरारा माझ्या नसून एका डिझायनरचा आहे आमि तो लवकरच त्यांना परत करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.
"सेलिब्रिटींचे महागडे कपडे किंवा त्यांची लाइफस्टाइल पाहून संकोचित होण्याची काहीच गरज नाही. जे आहे त्यातच आनंदी राहता आलं पाहिजे. हा फोटो मागच्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या एका फॅमेली फंक्शनमधला आहे. मी माझं एक सिक्रेट सुद्धा आज तुम्हाला सांगते. बऱ्याचदा मी परिधान करत असलेले असे डिझायनर कपडे मी उधारीवर घेत असते. माझ्याकडे जे दागदागिने आहेत ते अर्जेंटमच्या विमलने मला लोनवर दिले आहेत. हा पावडर ब्लू शरारा माझी मैत्रीण मोहिनी छाबडिया यांनी पाठवला आहे. हा ड्रेस ड्रायक्लीन करुन तिला पुन्हा पाठवून देईन", असं झीनत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे त्या लिहितात, "मी फक्त हे याचसाठी सांगते की तरुणांनी त्यांच्या खर्चावर ताबा ठेवावा. मी बऱ्याचदा अशा काही तरुणांना पाहते जे प्रसिद्ध डिझायनर्सचे कपडे परिधान करत असतात. तुम्ही भाड्याने कपडे घ्या किंवा खरेदी करा पण उगाच अवाजवी खर्च करु नका. तुमचा बँक बॅलेन्स टिकवून ठेवा. तुम्ही जे कपडे परिधान करता त्यात तुम्ही समाधान मानलं पाहिजे."