जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. भारतदेखील या जीवघेण्या विषाणूचा सामना करतोय. सर्वत्रच परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे एकच पर्याय म्हणून सोशल डिस्टन्सिंगशिवाय घरात राहण्याचा सल्ला मानला तर या अदृश्य शत्रूशी आपण युद्ध जिंकू शकू. तुर्तास एक सुखद बातमी कोरोनासंदर्भात समोर आली आहे.बॉलिवूड गायिका कनिका कपूरनंतर अभिनेत्री झोया मोरानीला देखील कोरोनाची लागण झाली होती. झोया ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांची मुलगी आहे.
झोयाने चाहत्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. झोया मोरानीने कोरोनाव्हायरस या आजारावर यशस्वी मात केली असून तिला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता ती कोरोनाच्या संकटातून ठणठणीत बरी झाली आहे. 6 एप्रिल रोजी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला 7 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी शेअर करुन ही चांगली बातमी चाहत्यांना सांगितली होती. झोयाने लिहिले की, 'वॉरियर्सची निरोप घेण्याची वेळ आली आहे, मी नेहमीच त्यांनी केलेली कामगीरी विसरणार नाही. सदैव त्यांची ऋणी राहिल.
ती मार्च महिन्यात श्रीलंकेहून परतली होती. त्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. मोरानी कुटुंबात सर्वप्रथम शाजाला कोरोनाची लागण झाली होती. शाजानंतर झोया आणि करीम मोरानी यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या होत्या. झोयापूर्वी तिची धाकटी बहीण शाजालाही कोरोनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले होते, परंतु कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिचे वडील करीम मोरानी अद्याप उपचार घेत आहेत.