राधिका आपटे सध्या नेटफ्लिक्सच्या सगळ्याच वेबसिरिजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ती आता घोल या नेटफ्लिक्सच्या सिरिजमध्ये झळकत असून तिच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, राधिकाचे नाव चर्चेत येण्यामागे आणखी एक कारण आहे. राधिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माच्या सुई धागा या चित्रपटातील तिच्या लूकवरून तिची चांगलीच खिल्ली उडवली जात होती. आता तिच्यानंतर राधिकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स आणि घोल या तिन्ही सीरिजमध्ये राधिका आपटेची भूमिका आहे. लस्ट स्टोरीजमध्ये कालंदी, सेक्रेड गेम्समध्ये अंजली माथुर आणि घोलमध्ये निदा रहिम अशा भूमिका तिने साकारल्या आहेत. आजकाल ती नेटफ्लिक्सच्या सगळ्याच सिरिजमध्ये दिसत असल्याने नेटफ्लिक्स आणि राधिका हे एक समीकरणच बनले आहे. पण यावरूनच तिची सोशल मीडियावर टर उडवली जात आहे. राधिका आपटे नेटफ्लिक्सची सूर्यवंशम असल्याचे नेटिझन्सनी म्हटले आहे.
राधिकाने पॅडमॅन, बदलापूर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले असले तरी सध्या ती चित्रपटांपेक्षा वेबसिरीजला जास्त वेळ देत आहे. राधिका आणि नेटफ्लिक्सने मिळून या ट्रोलना चांगलेच उत्तर दिले आहे. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ओम्नीप्रेजेंट ही नवी वेबसिरीज आणणार असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये राधिका आपल्याला बोलताना दिसते की, मला ज्यावेळी नेटफ्लिक्सने या सिरिजची ऑफर दिली, त्यावेळी मी भरपूर काम केले आहे अजून करण्याची गरज आहे का असा विचार माझ्या मनात आला होता. पण विक्रमादित्य मोटवानी यांनी मला सांगितले की, ही अशी सिरिज असणार आहे, ज्यात प्रत्येक भूमिकेत मीच दिसणार आहे.
या व्हिडिओ वरून या सर्व मीम्सना राधिका आणि नेटफ्लिक्सने अतिशय सकारात्म दृष्टीने पाहिले असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. राधिका आपटे है या ट्रेंडमध्ये फूड डिलिव्हरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या झोमॅटोने देखील उडी घेतली आहे. त्यांनी राधिका आपटेची चक्क पनीरसोबत तुलना केली आहे. त्यांच्या प्रत्येक पदार्थात पनीर असतो असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांच्या पदार्थाची नावे लिहून फक्त राधिकाच व्हर्सटाइल नाहीये असे म्हटले आहे.