रवींद्र मोरे
दाऊद इब्राहिम, मन्या सुर्वे, अरुण गवळी, हाजी मस्तान, इकबाल सेठ या अंडरवर्ल्ड डॉनची नावे जरी ओठावर आली तरी, त्यांच्या गुन्हेगारीजगताचे अनेक किस्से मनात धडकी भरवितात. पोलिसांच्या लिस्टमध्ये क्रूरकर्मा, अट्टल, सराईत गुन्हेगार असा उल्लेख केला गेलेले हे गँगस्टर बॉलिवूडमुळे लिजेंड बनले हेही तेवढेच खरे आहे. १९७८ मध्ये आलेला ‘डॉन’ हा चित्रपट जर आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल, की प्रेक्षकांना डॉनच्या गुन्हेगारी कारनाम्यांची चीड येत नव्हती, तर त्याच्या अॅक्शनवर ते अक्षरश: भावून गेले होते. त्याहीपुढे सिनेमाला मिळालेल्या यशामुळे निर्मात्यांनी जणू काही सराईत गुन्हेगारांची बायोपिक बनविण्याची स्पर्धाच लावली. एकापाठोपाठ येत असलेल्या गॅँगवॉरवरील चित्रपट प्रेक्षकांच्या मनात गॅँगस्टरप्रती आदर निर्माण करू लागले. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यात गॅँगस्टरची इमेज बदललेली बघावयास मिळते.
* शूटआउट अॅट वडाला
मुंबई पोलिसांच्या पहिल्या एन्काउंटरचा बळी ठरलेला मन्या सुर्वे याच्या जीवनावर आधारित संजय गुप्ता यांनी ‘शूटआऊट अॅट वडाला’ हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत आणला. सिनेमा रिलीज होण्याच्या सुरुवातीपासूनच मन्याच्या चांगुलपणाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. तो एक प्रामाणिक गॅँगस्टर होता, आज तो असता तर दाऊद संपला असता, अशा चर्चा रंगल्या. काहींनी तर तो पहिला मराठी गॅँगस्टर असल्याच्याही अभिमानात्मक पोस्ट शेअर केल्या. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना भावणार हे जवळपास निश्चित होते. अगदी तसेच घडले. जॉन अब्राहम याने साकारलेली मन्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.
रईस
या सिनेमात अब्दुल लतीफ याची कथा दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. दारूबरोबरच अवैधरीत्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा अब्दुल लतीफ पुढे गॅँगस्टर बनतो. गुन्हेगारीच्या साम्राज्यात स्वत:चा दबदबा निर्माण करणारा लतीफ गॅँगस्टर पोलिसांच्या रडारवर असतो; मात्र ज्या पद्धतीने या गॅँगस्टरला लोकांसमोर दाखविले गेले, त्यावरून तो सिनेमातील मुख्य हिरो आहे, हे स्पष्टपणे अधोरेखित होते. सिनेमात शाहरुखबरोबर नवाजुद्दीन सिद्दिकीही लीड रोलमध्ये आहे. सिनेमा पूर्णपणे गुन्हेगारीजगताशी संबंधित आहे.
कंपनी
रामगोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील नातेसंबंध दाखविण्यात आले आहे. सिनेमात अजय देवगण आणि विवेक ओबेरॉय यांनी गँगस्टरची भूमिका साकारली आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या दाऊदबरोबरचे संबंध याच प्रकरणानंतर छोटा राजनशी बिनसले होते. त्याच आशयाचा या सिनेमात समावेश करण्यात आला होता. प्रेक्षकांना तो चांगलाच भावला होता. आजही या सिनेमातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
ब्लॅक फ्रायडे
एस. हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमातून मुंबई अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआय यांच्यातील संबंध दाखविण्यात आले. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा सिनेमा १९९३ च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ज्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या प्लॅनिंगपासूनची कथा दाखविली गेली. सिनेमातील पवन मल्होत्रा याची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली; मात्र कथेमुळे हा सिनेमा न्यायालयीन प्रक्रियेत अडकला. ज्यामुळे कित्येक वर्षे तो रिलीज होऊ शकला नाही.
डी-डे
या सिनेमात ऋषी कपूर यांनी इकबाल सेठ ऊर्फ गोल्डमॅनची भूमिका अतिशय खुबीने साकारली. निखिल आडवानीच्या या सिनेमात इकबाल सेठ हा पाकिस्तानात राहणारा गॅँगस्टर भारतात दहशतवादी कारवायांना कशा पद्धतीने हाताळतो, हे दाखविण्यात आले. संपूर्ण सिनेमा अशाच एका आॅपरेशनवर आधारित आहे. ज्याद्वारे भारतीय काही गुप्तचर अधिकारी इकबालला किडनॅप करून भारतात आणू इच्छितात. सिनेमा कोणत्या गॅँगस्टरवर आधारित आहे, ते सरतेशेवटी प्रेक्षकांच्या लक्षात येते.
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई
या सिनेमात हाजी मस्तान याच्या नेतृत्वाखाली मुंबईत संघटित झालेल्या गॅँग्सची कथा दाखविण्यात आली आहे. हाजी मस्तान १९६० ते १९७० च्या दशकात मुंबईमध्ये चांगलाच सक्रिय होता. दिग्दर्शक मिलन लुथरिया यांनी सिनेमात चांगलाच ड्रामा भरल्याने प्रेक्षकांना तो भावला. अजय देवगण याने हाजी मस्तानची भूमिका साकारली होती, तर इमरान हाश्मी याची भूमिका दाऊदशी मिळती-जुळती होती.