Join us

बॉलीवूडच्या घराणेशाहीचे लोण मराठीत नाही...

By admin | Published: February 10, 2016 2:01 AM

आदिनाथ कोठारेपासून ते गश्मीर महाजनीपर्यंत अनेक स्टारपुत्र मराठीमध्ये येत असले तरी बॉलीवूडप्रमाणे घराणेशाहीचा दबदबा मराठीमध्ये कमीच पाहावयास मिळत आहे.

आदिनाथ कोठारेपासून ते गश्मीर महाजनीपर्यंत अनेक स्टारपुत्र मराठीमध्ये येत असले तरी बॉलीवूडप्रमाणे घराणेशाहीचा दबदबा मराठीमध्ये कमीच पाहावयास मिळत आहे. खान, कपूर, चोप्रा, खन्ना यांची घराणेशाही बॉलीवूडमध्ये पाहावयास मिळते. कपूर घराण्याचे नाव तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा आता रणबीर कपूरने आपले स्थान या चंदेरी दुनियेत निर्माण करून सुरू ठेवली आहे. सलमान खान, आमीर खान या खानांकडे तर १०० करोड बॉक्स आॅफिस कलेक्शन क्लब म्हणूनच पाहिले जाते. बॉलीवूडमध्ये जरी घरोशाहीचा दबदबा असला तरी मराठी चित्रपटसृष्टीत मात्र काही अपवाद सोडता, स्टार सन्स पाहायला मिळाले नाहीत. अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी ऐंशी-नव्वदच्या दशकात मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनय व विनोदी शैलीने अक्षरश: वेड लावले होते. त्याच काळात महेश कोठारे यांनी त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याला ‘माझा छकुला’ या चित्रपटातून लाँच केले होते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आदिनाथने आपल्या अभिनयाची चुणुक दाखवून दिली होती. मराठी चित्रपटसृष्टीला आता नवा तारा मिळणार अशा आशा त्या वेळी प्रेक्षकांमध्ये पल्लवित झाल्या होत्या आणि झालेही तसेच. २०१० मध्ये वेड लावी जिवा या चित्रपटातून कोठारेंच्या पहिल्या पिढीचे आगमन मराठी चित्रपटसृष्टीत झाले.सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर हिनेदेखील २०१३ मध्ये एकुलती एक या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. सचिनचा एक विशिष्ट चाहता वर्ग आजही आहे, आता त्यांची मुलगी या रेसमध्ये उतरली असून पिळगावकरांची पुढची धुरा तिच्याच हातात आहे, असं म्हणावं लागेल. एवढंच नाही तर तिने बॉलीवूडमध्येदेखील आपला जम बसविण्यास सुरुवात केली असून शाहरूख खानच्या एका आगामी चित्रपटात झळकण्याची संधी तिला मिळाली आहे. रवींद्र महाजनी यांचा मुलगा, गश्मीर महाजनी याने २०१० साली मुस्कुराके देख जरा या हिंदी सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर त्याने मराठीत कॅरी आॅन मराठा आणि देऊळ बंद या सिनेमांतही अभिनय केला. तसेच रमेश देव यांचा मुलगा अजिंक्य देव याने १९८५ साली अर्धांगिनी या सिनेमातून करिअरची सुरुवात केली. आजवर त्याने हिंदी-मराठी चित्रपटांतून अनेक विविधांगी भूमिका साकारून वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अजिंक्य देव, आदिनाथ कोठारे, श्रिया पिळगावकर, गश्मीर महाजनी यासारखे काही अपवाद सोडले तर आपल्या मराठी इंडस्ट्रीत कलाकारांची नेक्ट जनरेशन काही पाहायला मिळाली नाही. मराठी सिनेमातील बऱ्याच कलाकारांची मुले ही विविध बिझनेस किंवा दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मुद्दाम स्वत:ला या झगमगाटापासून दूर ठेवले असल्याचे दिसते. अशोक सराफ यांनी त्यांचा मुलगा अनिकेत सराफ याच्या नावाने अनिकेत टेलिफिल्म हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. निवेदिता सराफ या त्याचे काम पाहतात. परंतु त्यांच्या मुलाचे दर्शन काही मोठ्या पडद्यावर अजून तरी झाले नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची अभिनय व स्वानंदी ही दोन मुले आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळेल, अशी आशा आपण करुयात. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याच्याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मल्हार लवकरच अभिनय क्षेत्रात येत असून तो सिनेमा करीत असल्याचे बोलले जात आहे. परंतु यावर नाना म्हणतात, मल्हारने राम गोपाल वर्मा यांना २६/११ या फिल्मसाठी असिस्ट केले आहे. आणि तो लवकरच मला माझ्या आगामी चित्रपटासाठी ज्यात मी लेखन, दिग्दर्शन व अभिनय करतोय यासाठी असिस्ट करेल. आता पाहुयात मल्हार अभिनय क्षेत्रात येतोय की पडद्यामागे राहूनच पाटेकरांचे नाव रोशन करतोय. नागेश भोसले यांचा मुलगा अमरेंद्र भोसले याने २०१५ मध्ये आलेल्या पन्हाळा या सिनेमातून सिनेमॅटोग्राफर म्हणून सुरुवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: नागेश भोसले यांनीच केले होते. आपल्या मुलात जर कला असेल आणि त्याला अभिनय क्षेत्रात यायचे असेल तरच त्याने यावे. मी माझ्या मुलाला अभिनय कर किंवा सिनेमॅटोग्राफीमध्ये ये असे कधीच सांगितले नव्हते. तो सर्वस्वी त्याचा निर्णय होता, असे नागेश भोसले सांगतात.बॉलीवूडमध्ये ज्याप्रमाणे आजोबा, मुलगा, बहीण, भाऊ असे एका फॅमिलीमधले अनेक जण आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात. परंतु मराठी इंडस्ट्रीत एक पिढी जरी इंडस्ट्रीत आली तरी फार मोठी गोष्ट असल्यासारखे वाटते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही असणे ही चांगलीच गोष्ट आहे. आज आपण याचे उदहारण हिंदी चित्रपटसृष्टीत पाहतो. अनेक चांगले स्टार अ‍ॅक्टर्स यामुळे आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे मराठीतही अभिनेत्यांची नेक्स्ट जनरेशन आणि घराणेशाही प्रेक्षकांना पाहायला मिळतेय का याची प्रतीक्षा करूयात.

- प्रियांका लोंढे