सध्या अनेक बॉलिवूड सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होत आहेत. 'वीर झारा', 'कल हो ना हो', 'तुंबाड' हे सिनेमे पुन्हा रिलीज झाले अन् या सिनेमांना पुन्हा एकदा प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अनिल कपूर यांचा एक गाजलेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होतोय. डेव्हिड धवन दिग्दर्शित हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला लोक उत्सुक असतील यात शंका नाही. या सिनेमाचं नाव 'बीवी नंबर १'.
'बीवी नंबर १' पुन्हा होतोय रिलीज
डेव्हिड धवनची दिग्दर्शित मनोरंजन करणारा 'बीवी नंबर १' सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर परतत आहे. १९९९ साली रिलीज झालेला हा ब्लॉकबस्टर सिनेमा डेव्हिड धवन यांच्या फिल्मी करिअरमधील महत्वाचा सिनेमा मानला जातो. पूजा (करिश्मा कपूर), रुपाली (सुष्मिता सेन), प्रेम (सलमान खान), लखन (अनिल कपूर) अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं. ९० च्या दशकातील स्टाइल आणि डान्स या सिनेमातून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळेल यात शंका नाही.
या तारखेला रिलीज होणार सिनेमा
'बीवी नंबर १' हा सिनेमा २९ नोव्हेंबरला पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज व्हायला सज्ज आहे. 'चुनरी चुनरी' आणि 'इश्क सोना है' यांसारखी गाण्यांचा थिएटरमध्ये प्रेक्षकांना पुन्हा आनंद मिळेल यात शंका नाही. डेव्हिड धवन, वासू भगनानी यांनी या सिनेमाची निर्मिती केलीय. PVR, INOX या थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. सलमान खान-अनिल कपूरची विनोदी जुगलबंदी पुन्हा अनुभवायला चाहते आतुर आहेत.