बोमन इराणी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी डरना मना है या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बोमन यांनी आज बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले असले तरी त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. बोमन यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्ट्रगलिंग डेजविषयी नुकतेच सांगितले आहे.
ऑफिशिअल ह्युमन्स ऑफ बॉम्बे या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर बोमन इराणी यांचा स्ट्रगल आपल्याला वाचायला मिळत आहे. त्यात लिहिले आहे की, मी जन्माच्याआधीच माझ्या वडिलांचे निधन झाले होते. ते एक वेफर्सचे दुकान चालवत असत. त्यांच्या निधनानंतर माझ्या आईने हे दुकान सांभाळायला सुरुवात केली. माझ्या बहिणी शाळेत जायच्या आणि माझ्या आईला दुकानात जायचे असायचे. त्यामुळे मला देवळातील पुजाऱ्याच्या पत्नीकडे ती ठेवायची. अनेक वर्षं तिने एकटीनेच घर चालवले. मी शाळेत जायला लागल्यानंतर मला बोलायला आणि कोणतीही गोष्ट समजून घ्यायला त्रास होत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे माझे उच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून मी गायचो. एकदा मी इतके सुंदर गाणे गायले होते की, सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला. माझ्या आईने हे रेकॉर्ड करून ठेवले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढला.
मी शाळा संपल्यानंतर विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले. पण शिक्षणापेक्षा नाटक आणि इतर कलांमध्ये मला अधिक रस होता. मी कॉलेज झाल्यावर नोकरी करायला सुरुवात केली. मी ताज हॉटेलमध्ये रूम सर्विसचे काम करत होतो. त्यानंतर दीड वर्षांनी मला तिथे वेटर म्हणून काम करायला मिळाले. पण माझ्या आईचा अचानक अपघात झाला आणि मी नोकरी सोडून दुकान सांभाळायला लागलो. मी अनेक वर्षं दुकानाच्या कामातच व्यग्र होतो. त्या दरम्यान माझे लग्न झाले, मला मुले झाली. मी दुकान व्यवस्थितपणे चालवत असलो तरी एक गोष्ट मी चांगलीच मिस करत होतो.
माझे वडील फोटोग्राफर होतो आणि मला देखील फोटोग्राफीची प्रचंड आवड होती आणि त्यामुळे मी या क्षेत्रात करियर करावे यासाठी माझ्या पत्नीने मला प्रोत्साहन दिले. काही वर्षं स्ट्रगल केल्यानंतर मला या क्षेत्रात चांगलेच यश मिळाले. फोटोग्राफी करत असताना माझा एक मित्र मला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी घेऊन गेला आणि माझी त्यासाठी निवड झाली. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. मी 180 जाहिरातील आणि काही नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर मला शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या शॉर्ट फिल्मची क्लिप विधू विनोद चोप्रा यांनी पाहिली आणि त्यांनी मला भेटायला बोलावले. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कोणताच चित्रपट नव्हता. पण भविष्यात मला काम देण्याची त्यांनी कबुली दिली होती. काही काळानंतर त्यांनी मला मुन्नाभाई एमबीबीएससाठी बोलावले आणि वयाच्या 35 व्या वर्षी माझे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.