हवाहवाई गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी (Sridevi). कलाविश्वातील पहिली लेडी सुपरस्टार म्हणून आजही तिचं नाव प्रथम घेतलं जातं. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये श्रीदेवी यांचं अचानक निधन झालं आणि सगळी सिनेसृष्टी हादरुन गेली. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक गोष्टींच्या अफवा पसरल्या होत्या. काहींच्या मते, त्यांचा मृत्यू घातपातामुळे झाला होता. तर, काहींच्या मते तो नैसर्गिकरित्या होता. परंतु, त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ५ वर्षांनी त्यांचे पती दिग्दर्शक बोनी कपूर यांनी मौन सोडलं आहे. इतकंच नाही तर श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर, तो अपघाती होता असा खुलासाही त्यांनी केला आहे.
२०१८ मध्ये श्रीदेवी त्यांच्या कुटुंबासोबत दुबईला गेल्या होत्या. येथील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी बोनी कपूर यांच्यावरही आरोपप्रत्यारोप केले होते. इतंकच नाही तर बोनी कपूर यांची लाय डिटेक्ट चाचणीही करण्यात आली होती. त्यावेळी बोनी कपूर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या आरोपांवर आता बोनी कपूर यांनी भाष्य केलं आहे.
अलिकडेच त्यांनी 'द न्यू इंडियन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी श्रीदेवी यांच्या मृत्युच्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. "श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालाच नव्हता. तो एक अपघाती मृत्यू होता. तिच्या निधनानंतर मला लाय डिटेक्टर चाचणीलाही सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी मी अनेक गोष्टींना सामोरा गेलो आहे. ज्याची कधी तिने कल्पनाही केली नसेल", असं बोनी कपूर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "खरंतर मला याविषयी बोलायचं नव्हतं. माझी चौकशी झाली तेव्हा सलग दोन दिवस मी याविषयी बोलत होतो. दुबईतले अधिकारी मला म्हणाले होते, की आम्हाला हे सगळं करावं लागतंय कारण, आमच्यावर भारतीय मीडियाचा दबाव आहे. त्या लोकांनाही माहित होते की यात काही काळंबेरं नाहीये. तरी मला लाय डिटेक्टर चाचणी द्यावी लागली. त्यानंतर जो अहवाल आला त्या श्रीदेवीचा मृत्यू आकस्मिक होता हे स्पष्ट झालं."
हे होतं श्रीदेवीच्या मृत्यूचं खरं कारण
"श्रीदेवीचं जेव्हा निधन झालं त्यावेळी त्या स्ट्रिक्ट डाएटवर होत्या. ती डाएट म्हणून खूप वेळ उपाशी राहायची. जेवणात मीठाचा समावेश करायची नाही. त्यामुळे अनेकदा तिला चक्कर यायची. डोळ्यासमोर अंधार यायचा. स्क्रिनवर छान दिसावं यासाठी ती हे सगळं करायची. आमचं लग्न झाल्यापासून अनेकदा तिला लो बीपी, ब्लॅकआऊट या सारखा त्रास झाला होता'', असं बोनी कपूर यांनी सांगितलं.