बोनी कपूर यांचं खरं नाव हे नाहीच! इंटरेस्टिंग आहे त्यांच्या नावाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 01:41 PM2021-07-19T13:41:42+5:302021-07-19T13:44:26+5:30
एका ताज्या मुलाखतीत खुद्द बोनी यांनी त्यांच्या ख-या नावाचा खुलासा केला. शिवाय ‘बोनी’ हे नाव कसं पडलं, हेही सांगितलं.
बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्यांपैकी एक असलेले बोनी कपूर (Boney kapoor) यांनी अनेक हिट सिनेमांची निर्मिती केली. 'हम पाँच', 'वो सात दिन', 'मिस्टर इंडिया', 'रात', 'अंथम', 'द्रोही', 'रूप की रानी चोरों का राजा', 'प्रेम' आदी बऱ्याच सुपरडूपर हिट चित्रपट बोनी कपूर यांच्या नावावर आहेत. वयाच्या उण्यापु-या विशीत बॉलिवूडमध्ये आलेल्या बोनी यांनी अथक संघर्षानंतर इंडस्ट्रीत एक ओळख निर्माण केली. या बोनी कपूर यांचं खरं नाव काय आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत खुद्द बोनी यांनी त्यांच्या ख-या नावाचा खुलासा केला. शिवाय ‘बोनी’ हे नाव कसं पडलं, हेही सांगितलं.
तर बोनी कपूर यांचं खरं नाव अचल कपूर आहे. बोनी हे नाव त्यांना कसं चिकटलं तर शाळेच्या दिवसापासून. शाळेत असताना बोनी कपूर फारच सडपातळ होते. त्यामुळं त्यांना गमतीनं ‘बोनी’ हे नाव पडलं आणि पुढे हेच नाव त्यांना चिकटलं.
बोनी कपूर यांनी 1983 मध्ये मोना शौरीसोबत (Mona Shourie) लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोनच वर्षांत बोनी व मोना यांचा पहिला मुलगा अर्जुनचा जन्म झाला आणि नंतर पाच वर्षांनी अंशुला जन्मली. पण अर्जुन कपूर (Arjun Kapoor) उणापुरा 11 वर्षांचा झाला असेल नसेल तेव्हा त्याच्या आईबाबाचा घटस्फोट झाला. मोना व बोनी यांचा संसार मोडला आणि त्याचवर्षी बोनी यांनी सुपरस्टार श्रीदेवींसोबत (Sridevi) लग्नगाठ बांधली.
कधीच अभिनेता बनण्याचा विचार मनात आला नाही...
1975 साली वयाच्या 20 व्या वर्षी मी मनमोहन देसाई यांच्याकडं काम करायला सुरूवात केली होती. पुढच्या वर्षी मी दिग्दर्शक शक्ती सामंत यांना अस्टिस्ट करू लागलो. त्याआधी मला मला रोजचे 5 रूपये 50 पैसे मिळायचे. शक्ती सामंत यांच्या ‘अनुरोध’ या सिनेमात अस्टिस्टंट म्हणून काम केल्यावर मला 5 हजार रूपये मिळाले होते. माझ्या वडिलांनी ‘मुगल ए आजम’साठी अस्टिस्टंट म्हणून काम केले होते. पुढे ते प्रोड्यूसर बनलेत. मलाही निर्मााता बनायचे होते. अभिनेता बनण्याचा विचार कधीच माझ्या डोक्यात आला नाही, असं त्यांनी सांगितलं.
अन् दारू व सिगारेटचा त्याग केला..
मी चेन स्मोकर होतो. एकदा मी एकाचवेळी 9 बिअरच्या बाटल्या पोटात रिचवल्या होत्या. पण या व्यसनामुळं अनेक लोक बर्बाद होताना मी पाहत होतो. याऊलट या दोन्ही व्यसनांपासून दूर असलेले लोक उत्तम काम करत असल्याचेही मला अनुभवत होतो. त्यामुळे मी दारू व सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला, असंही बोनी कपूर यांनी सांगितलं.