बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पत्नी श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला इथपासून ते लग्नाआधी श्रीदेवी गरोदर होत्या का पर्यंत अनेक गोष्टींवर खुलासा केला. लोकांना वाटतं की श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर होत्या पण खरं असं नाहीये. मग यामागचं सत्य काय आहे हे बोनी कपूर यांनी नुकतंच सांगितलं आहे.
यु्ट्यूबर रोहन दुआला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, "माझं श्रीदेवीशी दुसरं लग्न झालं. आम्ही २ जून १९९६ रोजी शिर्डीत जाऊन लग्न केलं होतं. तिथे आम्ही एक रात्र राहिलो. जानेवारीत जेव्हा श्रीदेवी गरोदर असल्याचं दिसू लागलं तेव्हा आमच्याकडे खरं सांगण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. म्हणून आम्ही सार्वजनिक लग्न केलं.त्यामुळे लोकांच्या नजरेत आमचं लग्न जानेवारी १९९७ साली झालं असंच आहे. म्हणूनच काही लोक म्हणतात की श्रीदेवीच्या पहिली प्रेग्नंसी म्हणजेच जान्हवी वेळी आमचं लग्नच झालं नव्हतं. पण ते तसं नाही."
ते पुढे म्हणाले, "आमचं संपूर्ण कुटुंब धार्मिक आहे. श्रीदेवी असो, किंवा अनिल कपूरची पत्नी सुनिता असो किंवा माझी मुलगी जान्हवी, आम्ही सगळेच धार्मिक आहोत. जान्हवी दर तीन महिन्यांनी तिरुपतीच्या दर्शनाला जाते. श्रीदेवी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला तिरुपतीला पायी जायची. मी जेव्हा संकटात असायचो श्री अनवाणी जुहू ते सिद्धीविनायक जात होती."
श्रीदेवी यांना चेन्नईतील घराबद्दल खूप आपुलकी होती. तिथे गेल्यानंतर आजही श्रीदेवी सोबत असल्याचा भास होतो असंही ते म्हणाले. बोनी आणि श्रीदेवी यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. तर बोनी कपूर यांना पहिल्या पत्नीपासून अंशुला आणि अर्जुन कपूर हे दोन मुलं आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईतील हॉटेलमध्ये बाथटबमध्ये श्रीदेवी यांचा मृतदेह आढळून आला होता.