श्रीदेवी यांचे निधन 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईत झाले होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सदमा, नागिन, चालबाज, लम्हे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सध्या त्यांची मुलगी जान्हवीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. बोनी यांनीच एका मुलाखतीत त्यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगितले होते.
बोनी कपूर यांनी मुलाखतीत सांगितले होते की, श्रीदेवी यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी त्यांना बारा वर्षं लागले होते. श्रीदेवी यांना जेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिले तेव्हापासून ते त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करू लागले होते. त्यांना फॉलो करत करत बोनी कपूर चेन्नईला पोहचले होते. जेव्हा बोनी श्रीदेवी यांना भेटायला चेन्नईला गेले. त्यावेळी त्या शूटिंगसाठी सिंगापुरला गेल्या होत्या. त्यानंतर ते नाराज होऊन मुंबईत परतले होते. बोनी कपूर १९८४ साली मिस्टर इंडिया चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन श्रीदेवी यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी श्रीदेवी यांच्या आईने या चित्रपटासाठी १० लाखाचे मानधन मागितले होते. पण बोनी कपूर यांनी ११ लाख रुपये देऊन या चित्रपटासाठी त्यांना साईन केले होते.
काही दिवसानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासमोर प्रेम व्यक्त केले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना १९९३ साली प्रपोझ केले. मिस्टर इंडियाच्या सेटवर बोनी स्वतः श्रीदेवी यांना कोणता त्रास तर होत नाही ना याची काळजी घ्यायचे. इतकेच नाही तर त्यावेळी त्यांनी श्रीदेवींसाठी वेगळा मेकअप रुम अरेंज केला होता. त्यानंतर श्रीदेवी बोनी कपूर सोबत कम्फर्टेबल वावरू लागल्या. यादरम्यान बोनी कपूर यांचे श्रीदेवींवरील प्रेम आणखीन वाढू लागले. जेव्हा श्रीदेवी चाँदनी चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले होते. तिथून परतल्यानंतर बोनी कपूर यांनी आपल्या पत्नीला श्रीदेवींबद्दल सांगितले. त्यांनी मोनाला सांगितले की, श्रीदेवींवर त्यांचे प्रेम आहे. त्यानंतर मोना खूप दुःखी झाल्या होत्या. त्यांनीच गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.
मोना यांनी सांगितले होते की, माझ्यापेक्षा वयाने बोनी दहा वर्षे मोठे होते. जेव्हा माझे लग्न त्यांच्यासोबत झाले, तेव्हा मी १९ वर्षांची होती. मी त्यांच्यासोबतच मोठी झाली. आमच्या लग्नाला तेरा वर्षं झाले तेव्हा मला कळले की, माझ्या नवऱ्याचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. त्यानंतर आमच्या नात्यात काहीच उरले नाही. आम्ही नात्याला आणखीन एक संधी देऊ शकत नव्हतो. कारण त्यावेळी श्रीदेवी प्रेग्नेंट होती. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी २ जून १९९६ला अतिशय साध्या पद्धतीत लग्न केले होते.