Join us

हात तुझा हातातून...! उलगडणार ग्लॅमरपलीकडचे अरुण दाते !!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:14 PM

ख्यातनाम गायक दिवंगत अरुण दाते यांचे गतवर्षी ६ मे रोजी निधन झाले. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्या ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे.

ठळक मुद्देअरुण दाते यांना सांगितिक आदरांजली देण्यासाठी या वर्षी पासून अरुण दाते संगीत महोत्सव करण्याचे ठरविले आहे.

ख्यातनाम गायक दिवंगत अरुण दाते यांचे गतवर्षी ६ मे रोजी निधन झाले. त्याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे पुत्र अतुल अरुण दाते यांच्या ‘हात तुझा हातातून’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. वडील अरुण दाते यांच्या अनेक आठवणींना उजाळा देणारे, स्वराधनेसोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे आणि ग्लॅमरपलीकडे असलेले त्यांच्यातील वडिलपणाचे दर्शन घडवणारे हे पुस्तक ई-बुक रूपातही उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध निवेदिका श्रेयसी वझे- मंत्रवादी यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. ‘शुक्रतारा’ या अरुण दाते यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारणारे नामवंत संवादिनीवादक आणि चित्रकार विकास फडके यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे.या पुस्तकाच्या निमित्ताने अतुल दाते यांनी लोकमतशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. हे पुस्तक साकारण्यामागची पार्श्वभूमी, त्याचे नामकरण, त्याचे मुखपृष्ठ अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांनी माहिती दिली.

असे झाले नामकरणबाबांच्या माणुसकीचे बोट धरून मी जगात वावरायला शिकलो. त्यांचे वय झाल्यानंतर माझ्या हाताच्या आधाराने ते अनेक समारंभात येत असत. ते माझा हात धरून येत आहेत याचा मला मानसिक त्रास व्हायचा, कारण आयुष्यभर अतिशय ताठ मानेने, सच्च्या व्यवहाराच्या आणि आधाराच्या कुबड्या न वापरता जो जगला, त्याला दहा पावलांसाठीही आधार घ्यावा लागतो आहे ही गोष्ट मी पचवू शकत नव्हतो. अर्थात वय झाल्यावर प्रत्येक माणसावर ही वेळ येतेच; पण तरीही आपल्या माणसाला त्या अवस्थेत बघून त्रास होतोच. समाधानाची गोष्ट एवढीच होती की, बाबांनीही माझा आधार सहजरीत्या स्वीकारला आणि मी सुद्धा त्यांना तो देऊ शकलो, असाच एकमेकांचा हात हातात घेऊन आयुष्याची वाटचाल होत गेली; काही प्रमाणात त्यांची आणि बऱ्याच प्रमाणात माझी. या पुस्तकाचें शिर्षक ‘हात तुझा हातातून’ हे या वरूनच सुचले, असे अतुल अरूण दाते यांनी सांगितले. आयुष्यभर बाबा आणि नंतर भेटत गेले असे अनेक निकटवर्तीय आहेत ज्यांचा हात हातात घेऊन किंवा ज्यांचा हात धरून मी पुढे जात राहिलो, असेही ते म्हणाले.बाबा नसल्याची कल्पना आजही करवत नाहीबाबांना जाऊन आता वर्ष होत यईल. एका वर्षात अनेक वर्ष एकत्रित घालविल्याचा भास मला होत आहे. मुळातच बाबा नसण्याची कल्पना मला आजही करवत नाही. आपल्या अत्यंत जवळच्या प्रेमाच्या लोकांना ईश्वर जेव्हा असा घेऊन जातो, तेव्हा मरण या संकल्पनेबद्दल आपण नव्याने विचार करायला लागतो. ' माणसाच्या असण्या आणि नसण्यामध्ये एका श्वासाचा फरक असतो. बाबांनी आमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण व्यापून टाकला आहे आणि मी तर म्हणेन की, माझा प्रत्येक श्र्वास त्यांचा होता, आहे आणि यापुढील प्रत्येक श्वासही त्यांनाच अर्पण आहे, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.हे पुस्तक लिहिताना मागील अनेक आठवणींना उजाळा मिळाला. त्यातील प्रिय आठवणी तुम्हा वाचकांसाठी उलगडल्या आणि अप्रिय आठवणी जाणीवपूर्वक टाळल्या कारण सकारात्मकतेचा वारसा मला बाबांकडून मिळाला आहे. ‘अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी ’ ही पाडगांवकरांची ओळ बाबा अक्षरश: जगले असे मला वाटते. माझ्या मनात आले, मी पुस्तक लिहिले.आणि तुम्ही ते वाचले... वरवर दिसायला ही प्रक्रिया सोपी वाटत असली तरी तशी ती नसते. यामध्ये अनेकांचा सहभाग असतो. मी स्वत: काही लेखक नाही. त्यामुळे माझे विचार, माझ्या आठवणी त्यातून तयार झालेली माझी मतं, सुसूत्रपणे योग्य शब्दात मांडण्यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले, असेही त्यांनी सांगितले.बाबांना सांगितिक आदरांजली देण्या साठी आम्ही या वर्षी पासून अरुण दाते संगीत महोत्सव करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवा अंतर्गत या वर्षी आम्ही मुंबई, पुणे, नाशिक येथे मिळून एकूण ५ कार्यक्रम करत आहोत,अशी माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :arun date