मुंबई - येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत होणाऱ्या कोल्डप्ले शो (ColdPlay Concert) ला भारतीय प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या शो ची तिकिटे खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड लागली आहे. Book My Show या वेबसाईटवरून या शो ची तिकीट विक्री सुरू होती. मात्र काही तासांत ही वेबसाईट क्रॅश झाली, त्यानंतर कोल्डप्लेचं तिकीट चढ्या दराने बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने मोठा वाद निर्माण झाला. मनसे, भाजपा या पक्षांनी बुक माय शोवर तिकिटाचा काळाबाजार करण्याचा आरोप केला. त्यानंतर आता या प्रकरणी बुक माय शो कंपनीचं स्पष्टीकरण आलं आहे.
बुक माय शोनं या आरोपांवर स्पष्टीकरण देत आमचं कुठल्याही अनधिकृत तिकीट विक्री अथवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मशी काही संबंध नाही. आमच्याकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. ब्रिटीश पॉप रॉक बँड कोल्डप्ले शोची तिकीटे सर्व चाहत्यांना मिळतील यासाठी आम्ही पाऊले उचलत आहोत. त्यासोबत कुठल्याही अनधिकृत व्यक्ती अथवा वेबसाईटवरून तिकीट अथवा पास खरेदी करू नका, ती तिकिटे बनावट असण्याची शक्यता आहे अशी सूचनाही बुक माय शोकडून चाहत्यांना देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी बुक माय शोचे सीईओ आणि संस्थापक आशिष हेमराजानी आणि त्यांचे टेक्निकल हेड यांना समन्स बजावलं होते. बुक माय शो प्लॅटफॉर्मनं कोल्डप्ले शोच्या तिकिटाच्या काळाबाजारात मदत केली असा त्यांच्यावर आरोप आहे. म्युझिक ऑफ द स्फेयर्ड वर्ल्ड टूरचा एक भाग म्हणून कोल्डप्लेचा शो १९ ते २१ जानेवारी दरम्यान नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडिअममध्ये आयोजित केला आहे. तर मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने हेमराजानी आणि त्यांचे टेक्निकल हेड यांनी समन्सला उत्तर दिले नाही. त्यांना पुन्हा नव्याने समन्स पाठवण्यात येणार असल्याचं सांगितले.
२५०० रुपयांची तिकिटे ३ लाखात विकल्याचा आरोप
कोल्डप्ले शो याला मिळणारा चाहत्यांचा प्रतिसाद पाहून या कार्यक्रमाच्या तिकिटांचा काळाबाजार करण्यात आला. त्यात २५०० रुपयांची तिकिटे काही वेबसाईट आणि व्यक्तींकडून ३ लाखांपर्यंत विकली जात होती असा आरोप करत बुक माय शोविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वकील अमित व्यास यांनी केली.
काय आहे प्रकरण?
२२ सप्टेंबरला तिकिट विक्री सुरू होण्याच्या आधी वेबसाईट क्रॅश झाली होती, काही लोकांनी सांगितले की, वेबसाईट पुन्हा ऑनलाईन झाल्यानंतर जेव्हा तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा नंबर ५ लाखाहून अधिकच्या रांगेत होता असं सांगितले. बुक माय शोच्या प्रवक्त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले की, १.३ कोटी चाहते तिकीट खरेदी करण्यासाठी उत्सुक होते. २२ सप्टेंबरला भारतातील कोल्डप्ले म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर २०२५ ची तिकीटे विक्री करण्यास सुरुवात केली. सर्व चाहत्यांना तिकीट मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. त्यासाठी प्रत्येकाला ४ तिकीटे खरेदी करण्याची मर्यादा होती असं सांगितले.
दरम्यान, आम्ही याबाबत फक्त पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली नाही तर या संपूर्ण प्रकरणात तपासात कुठलेही सहकार्य आवश्यकता असेल ते आम्ही करण्याचं काम करू असं बुक माय शो च्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्याशिवाय अनधिकृत तिकिटे खरेदी करणे चाहत्यांनी टाळावे, यातून ती तिकिटे खोटी आणि बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही बुक माय शोने म्हटलं आहे.