मुंबई : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा 'काला' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करत आहे. पा.रंजीत याचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने जरी फार कमाई केली नसली, तरी सिनेमाच्या बाकी व्हर्जनने जगभरात 120 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'काला' सिनेमा तामिळनाडूमध्ये 650 स्क्रीन्सवर रिलीज झाला होता आणि इथे या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळाली आहे. यूएस आणि ऑस्ट्रेलियात या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंटरनॅशनल मार्केटमध्ये एकूण 39.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकट्या तामिळनाडूमध्ये या सिनेमाने आत्तापर्य़ंत 47 कोटी 10 लाख रुपयांची कमाई केली आहे. तर आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये कालाने पाच दिवसात 13 कोटी 10 लाख रुपयांची कमाई केली आहे.
'काला' सिनेमाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन हे याआधी रिलीज झालेल्या 'कबाली' पेक्षा कमी आहे. हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात आलाय. तर या सिनेमाचं बजेट 80 कोटी रुपये इतकं आहे. भारतभर हा सिनेमा एकूण 1200 स्क्रीनवर रिलीज करण्यात आलाय. महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाने सॅटेलाईट राईट्स आणि म्युझिक राईट्सच्या माध्यमातून 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे.