मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे सोशल मीडियावर 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमाचा निषेध सुरू झाला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केबीसीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्विटरवर केलं जात आहे. त्यासाठी #Boycott_KBC_SonyTv वापरुन अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हा हॅशटॅग सध्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यापैकी कोणते शासक मुघल सम्राट औरंगजेबाचे समकालीन होते, असा प्रश्न केबीसीमध्ये एका स्पर्धकाला विचारण्यात आला. त्यासाठी महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह, शिवाजी असे चार पर्याय देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा 'शिवाजी' असा केलेला उल्लेख अनेकांना खटकला आहे. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. क्रूरकर्मा औरंगजेबासमोर मुघल सम्राट अशी उपाधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शिवाजी' असा एकेरी केल्यानं नेटकऱ्यांनी केबीसी आणि अमिताभ बच्चन यांना धारेवर धरलं आहे. निर्दोष व्यक्तींच्या हत्या करणाऱ्याला औरंगजेबाला 'मुघल सम्राट' आणि लोकांचं सरंक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना 'शिवाजी' म्हणणाऱ्या केबीसीचा निषेध. केबीसीवर बहिष्कार टाका, असं आवाहन सोशल मीडियावर अनेकांनी केलं आहे. भारताचा अभिमान कोण? औरंगजेब की शिवराय..? देशाच्या अभिमानासाठी एकत्र येऊ आणि केबीसीवर बहिष्कार घालू, अशी हजारो ट्विट्स सध्या पाहायला मिळत आहेत. शिवरायांचा एकेरी उल्लेख करून केबीसी कार्यक्रम पुढच्या पिढ्यांना नेमका कोणता इतिहास शिकवतो आहे? भारतावर आक्रमण करणाऱ्या औरंगजेबाचा इतका सन्मानपूर्वक उल्लेख करताना शिवरायांचा एकेरी उल्लेख कशासाठी? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत.