आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली व चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.काहींना ट्रेलर आवडला आहे. पण काहींनी मात्र ट्रेलर रिलीज होताच आमिरला फैलावर घेतलं आहे. ट्रेलर रिलीज होताच आमिर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’ला बायकॉट करण्याची मागणी होत असून ट्विटरवर #BoycottLaalSinghChaddha असा हॅशटॅग ट्रेंड करतोय.
आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे. हॉलिवूड सिनेमात टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती. हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध आहे. आमिरने एका हॉलिवूड चित्रपटाची कॉपी केलेली पाहून काही नेटकरी नाराज आहेत. टॉम हँक्सची कॉपी करण्यावरून नेटकऱ्यांनी आमिरला ट्रोल केलं आहे. याशिवाय आमिरच्या जुन्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला विरोध होतोय.
आमिरने भारतीय सभ्यता व संस्कृतीविरोधात अनेक वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर होतोय. शिवाय आमिरची एक्स-वाईफ किरण राव हिच्या एका जुन्या वक्तव्यावरूनही आमिर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.
देश असहिष्णु झाल्याचंं आमिर म्हणतो, त्याला भारत सोडून जायचं आहे, असं म्हणत एकाने आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
काहींनी यात करिना कपूरला सुद्धा ओढलं आहे. ‘मी माझे चित्रपट पाहत नाही, असं करिना म्हणते. मग आपण तिचे सिनेमे का पाहायचे? पाहूच नका,’असं एका युजरने कमेंट केली आहे. अनेकांनी मीम्स शेअर करत आमिरला ट्रोल केलं आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदननं केलं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ 1994 मध्ये आलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड सिनेमाचा रीमेक आहे. या चित्रपटात आमिर आणि करिना व्यतिरिक्त मोना सिंग,नागा चैतन्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आमिर खानचा हा सिनेमा येत्या 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.