Join us

Brahmastra: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' फक्त ७५ रुपयांत पाहण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 6:01 PM

Brahmastra: २३ सप्टेंबरला थिएटर्समध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. याच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. यात सर्वात जास्त प्रतिसाद ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळतो आहे.

मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)ने १६ सप्टेंबरला राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. यानिमित्ताने या दिवशी मल्टीप्लेक्समध्ये लोकांना फक्त ७५ रुपयांत चित्रपट पाहता येणार होता. मात्र नंतर एमएआईनं ही तारीख पुढे ढकलली आणि आता फक्त ७५ रुपयांत चित्रपट २३ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या खास दिवशी लोकांना त्यांच्या आवडीच्या चित्रपटांचा आनंद कमी रुपयांत लुटता येणार आहे. यासाठी काही शहरांमध्ये या दिवसाच्या आगाऊ तिकिट विक्रीला सुरूवात झाली आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या या ऑफरला पुणे, मुंबई, कोलकाता सोबत बऱ्याच शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच इतर शहरांमध्येही सिनेमा डेसाठी बुकिंग सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिवशी लोक रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला 'ब्रह्मास्त्र' चित्रपट पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असतात. रिपोर्ट्सनुसार, मोठ्या संख्येने लोक ७५ रुपयांमध्ये 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra Movie) पाहण्याचा विचार करत आहेत.

याबाबत एका सूत्राने एका मीडिया हाऊसला सांगितले की, 'ब्रह्मास्त्रचे प्री-बुकिंग सर्वाधिक असेल, अशी आधीच अपेक्षा होती. त्याच्या शोच्या तिकिटांची सर्वाधिक विक्री होत आहे. चित्रपटाच्या सर्व शोची तिकिटे शुक्रवारी विकली जातील अशी आम्हाला आशा आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र, सीता रामम, हॉलिवूड फिल्म एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर वेयर ऑल अॅट वन्स, मराठी कॉमेडी बॉईज ३ला देखील बुकिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.

९ सप्टेंबर रोजी रिलीज झालेला अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दुसऱ्या सोमवारी या चित्रपटाने ५.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण २२०.७५ कोटींची कमाई केली आहे. येत्या वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा झेप घेता येईल, असे मानले जात आहे.
टॅग्स :ब्रह्मास्त्रआलिया भटरणबीर कपूर